मुख्य दहा परवानाधारकांकडे केवळ 838 रेन्ट अ कॅबची नोंद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांचे वाहतूक खात्यावर प्रश्नचिन्ह
पणजी : राज्यात सुमारे 6 हजार 762 रेन्ट अ कॅब असून त्या सर्व नियमबाह्यपणे रस्त्यावर चालत असल्याचा संशय आहे. वाहतूक खात्याने परवाने देताना नियम व अटी याकडे दुर्लक्ष करून परवाने दिले आहेत. राज्यात रेन्ट अ कॅबचे मुख्य परवानाधारक केवळ दहाजणच आहेत. जर दहा मुख्य परवानेधारक असतील तर साडेसहा हजारापर्यंत हा आकडा पोहचला कसा? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित पाटकर यांनी रेन्ट अ कॅबच्या परवान्याबाबत संशय व्यक्त करून आकडेवारीच जाहीर केली. दहा मुख्य परवानाधारकांकडे 838 कारची नोंद आहे, तर इतर सर्व रेन्ट अ कॅब हे फ्रँचायझींना देण्यात आलेल्या असून त्यांची संख्या 5 हजार 924 इतकी असल्याने संशय घेण्यास वाव असल्याचेही पाटकर म्हणाले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रेन्ट अ कॅब फ्रँचायझी हा प्रकार खपवून घेणार नसल्याचे सांगितल्याने या मुद्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. पाटकर म्हणाले, रेन्ट अ कॅबमुळे अपघातात वाढ होत आहे. कारण ज्या फ्रँचायझींना ही वाहने देण्यात आलेली आहेत, ती एकतरी गोव्याबाहेरील असल्याने त्यांना गोव्यातील रस्ते आणि वाहतूक नियम पूर्णपणे माहिती नसल्याने अपघात घडत आहेत.
लेखी उत्तरात अपूर्ण माहिती
सध्या सुरू असलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात काँग्रेस आमदारांनी तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी रेन्ट अ कॅबचा विषय उपस्थित केला होता. त्यांनी याविषयी वाहतूक खात्याकडे प्रश्न उपस्थित करून त्या प्रश्नावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून लेखी उत्तरही दिले आहे. परंतु त्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आली नसल्याचे अमित पाटकर यांनी सांगितले.
सरकारकडून स्थानिकांना त्रास
राज्यात केवळ दहा रेन्ट अ कॅबचे मूळ परवानाधारक आहेत. त्यातील बहुतांश परवाने धारकांनी कैकपटीने सबलीज तथा फ्रँचाईझींना वाहने दिली आहेत. यामुळे मूळ दहा परवानाधारकांची 838 आणि सबलीजवरील 5 हजार 924 वाहने मिळून एकूण 6 हजार 762 रेन्ट अ कॅब रस्त्यावर धावत आहेत. फ्रँचाईझींना दिलेल्या कार हटविल्यास स्थानिकांना व्यवसायासाठी त्याचा फायदा होणार आहे. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. पारंपरिक रेन्ट अ कॅब व्यावसायिकांच्या वाहनांना स्पीड गव्हर्नन्स बसविले आहेत. परंतु रेन्ट अ कॅबला बसविण्यात आले नसल्याने सरकार एकप्रकारे स्थानिकांनाच त्रास देत असल्याचे अमित पाटकर यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले.
असे आहेत वाहतूक खात्याचे नियम
- अर्जदाराकडे (परवानाधारक) 50 मोटार कॅब असाव्यात. त्यापैकी 50 टक्के कॅब ह्या वातानुकूलित असणे बंधनकारक आहे.
- कायद्याच्या कलम 88 च्या उपकलम (9) अंतर्गत जारी केलेल्या परवानग्या, व्यापक विमा, फिटनेस प्रमाणपत्र, अद्ययावत भरलेला मोटरवाहन कर असणे बंधनकारक
- नोंदणीच्या मालकाकडे किंवा अर्जदाराला नोंदणी / वित्तसंकलनाचा अधिकार मिळविण्यासाठी त्याच्या नावावर नोंदणीकृत किमान 50 वाहने असणे आवश्यक आहे.








