बार्देशमध्ये सर्वाधिक 231, तिसवाडीत 10
पणजी : भारताच्या अनेक शत्रुराष्ट्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या गोव्यात 260 मालमत्ता असल्याचे उघडकीस आले असून त्यापैकी 124 मालमत्तांचे राज्य सरकारने मूल्यांकन केले आहे. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे या मालमत्तांचे कुणीच वारसदार नसल्याचा फायदा उठवत अनेकांनी त्या बळकावल्या असून काहींनी तर त्याही पुढे जाताना अशा अनेक मालमत्ता परस्पर विकूनही टाकल्या आहेत. काही मालमत्तांवर इमारती उभारून लोकांना फ्लॅट विकण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता या मालमत्ता नवी दिल्लीच्या कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टीज ऑफ इंडिया (सीईपीआय) च्या ताब्यात गेल्यामुळे खरेदीदारांचे धाबे दणाणले आहेत. अशा मालमत्तेत इमारत बांधून फ्लॅट विकण्याचा प्रकार मडगाव येथे उघडकीस आला असून त्यातील सर्व ’बेकायदेशीर रहिवाशांना’ सीईपीआय ने भारत सरकारसोबत ’लिव्ह एन्ड लाईसेन्स’ करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. प्राप्त माहिती नुसार राज्यभरात असलेल्या अशा एकूण 260 मालमत्तामधील बार्देश तालुक्यात सर्वाधिक 231 तर तिसवाडीत 10 आणि डिचोली तालुक्यात 1 मालमत्ता आहे. दक्षिण गोव्यात सासष्टी आणि मुरगाव तालुक्यात 18 मालमत्ता शोधण्यात आल्या आहेत.
मूळ मालक शोधण्याची मोहीम
या मालमत्तांचे मूळ मालक शोधण्याची प्रक्रिया 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्नांती बार्देशमधील 120, तिसवाडीतील सात आणि डिचोलीत एक मालमत्ता शोधून त्यांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे. यातील बहुतांश मालमत्तांवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे. अधिकारी अद्याप बार्देशमधील 111 आणि डिचोलीतील तीन मालमत्तांच्या नोंदींची सत्यता तपासत आहेत. सीईपीआयकडून आम्हाला राज्यातील शत्रू मालमत्तांची सत्यता तपासण्यासंबंधी पत्र मिळाले आहे. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये केवळ आडनावेच प्रदान करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा अपूर्ण नावांच्या आधारे त्यांची ओळख पटवणे हे आव्हानात्मक काम आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शत्रुराष्ट्रात राहणाऱ्या या नागरिकांपैकी सर्वाधिक मालमत्ताधारक हे पाकिस्तानात स्थलांतरित झालेले लोक आहेत.








