गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरतीप्रक्रिया
पणजी : गोवा कर्मचारी भरती आयोगाने (स्टाफ सिलेक्शन कमिशन) जाहिरात केलेल्या 285 पदांसाठी सुमारे 10 हजारपेक्षा अधिक अर्ज सादर झाल्याची माहिती मिळाली आहे. गोव्यात बेकारी मोठ्या प्रमाणाम आहे किंवा सरकारी नोकरीसाठी उमेदवार मोठ्या प्रमाणात तळमळतात हेच त्यातून समोर आले आहे. आयोगातर्फे 21 नोव्हेंबर 2014 रोजी 285 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2024 अशी होती. या एकूण 20 दिवसांच्या कालावधीत हे अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजे सरासरी प्रतिदिन 500 पेक्षा अधिक अर्ज आयोगाकडे आल्याची पुष्टी होत आहे. एकूण 285 पदांपैकी 232 जागा या वसुली क्लार्कच्या असून 53 जागा ज्युनियर स्टेनोग्राफर या पदासाठी आहेत.
विविध सरकारी खात्यामध्ये त्या जागा भरायच्या आहेत. आयोगाने ‘क’ आणि ‘ड’ या वर्गातील सुमारे 1925 जागा भरण्याची मोहीम हाती घेतली असून त्यातील पहिल्या टप्प्यात वरील पदे भरण्यात येणार आहेत. सदर अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी संगणकावर आधारित प्रथम परीक्षा घेण्यात येणार असून त्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांनाच पुढील भरती फेरीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2025 नंतर ती परीक्षा घेतली जाणार आहे. सरकारी नोकरी म्हणजे पगार आणि सुट्ट्या भरपूर असे एकंदरित समीकरण असल्यामुळे खासगी नोकरीत असणारे देखील सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताना दिसून येतात. जागा रिकामी असल्यास त्याचा अहवाल पाठवण्याची सूचना आयोगाने यापूर्वीच केली असून त्यासाठी 31 जानेवारी 2025 अशी मुदत दिली आहे.








