कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा शनिवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीतही प्रचंड गाजला. या नामविस्ताराला कडाडून विरोध करत अधिसभा सदस्य अॅङ अभिषेक मिठारी यांनी सभेच्या सुरूवातीलाच मांडलेला स्थगन प्रस्ताव सभेचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी चर्चेविना स्वीकारला. चंद्र–सूर्य असेपर्यंत ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव राहील, नामविस्तार होणार नाही. या स्थगन प्रस्तावावर संपूर्ण सभागृहाचे एकमत होते. ‘आमचे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ’ अशा आशयाचे टीशर्ट घालून आणि काळ्या फिती बांधून नामविस्तार करा म्हणणाऱ्यांचा अधिसभा सदस्यांनी निषेध करीत, घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत नामविस्तारला तीव्र विरोध करुत अधिसभा सदस्यांनी घोषणाबाजी केले. शिवाजी विद्यापीठ हेच नाव ठेवावे यावरून प्रशासन, कुलगुरू व अधिसभा सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अभिषेक मिठारी व श्वेता परूळेकर यांनी निषेधाचे फलक सभेत भिरकावली. हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर चर्चा करण्यास सभेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. शिर्के यांनी नकार दिला. परिणामी, सद्यस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विद्यापीठाचे नाव बदलण्याची विशिष्ट संघटनाकडून वारंवार मागणी केली जाते. याच सभागृहाने ही मागणी पाच वर्षापुर्वी फेटाळून लावली आहे. आताही काही संघटनांनी अशी मागणी केली असून, एकदाच विद्यापीठाचे नाव बदलणार नाही, अशी भूमिका या सभागृहाने घ्यावी तसा ठराव मंजूर करावा, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी एकमताने केली. यावर कुलगुरू डॉ शिर्के यांनी नामविस्ताराचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. हा विषय संवेदनशील आहे, त्यामुळे चुकीचा शब्द कुणाच्या तोंडून जाण्यापेक्षा या स्थगन प्रस्तावावर चर्चा नको. आपल्या भावना संबंधित यंत्रणेपर्यंत आठ दिवसात पोहचवू असे आश्वासन सभागृहाला दिले. मात्र, सद्यस्यांचे यावर समाधान झाले नाही. हा प्रस्ताव स्वीकारला असून विद्यापीठाचा नामविस्तार होणार नाही हे रेकॉर्डवर घ्या, तसा ठराव करा यासाठी सदस्य अडून बसले. सद्यस्यांनी गोंधळ घालत नामविस्ताराची मागणी करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. निषेधाचे फलक भिरकावून देण्यात आले. शेवटी कुलगुरू डॉ शिर्के यांनी हा स्थगन प्रस्ताव चर्चेविना स्वीकारलयानंतर सद्यस्यांनी पुढील कामकाज सुरू करण्यास परवानगी दिली.
- आमच विद्यापीठ… शिवाजी विद्यापीठ
नामविस्ताराला विरोध करत सर्व अधिसभा सदस्यांनी ‘आमच विद्यापीठ…शिवाजी विद्यापीठ’ असा मजकूर असलेले टीशर्ट परिधान करून आले होते. काही सदस्यांनी काळ्या फिती लावून नामविस्ताराची मागणी करणाऱ्यांचा निषेध केला. अभिषेक मिठारी यांनी खुर्ची सोडून जमिनीवर बसणे पसंद केले. अभिषेक मिठारी, श्वेता परूळेकर, डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. रघुनाथ ढमकले, अॅङ स्वागत परूळेकर, डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. प्रताप पाटील, डॉ. मंजिरी मोरे, डॉ. तेजस्विनी मुडेकर, श्रीनिवास गायकवाड, आदींनी या विषयावर चर्चा केली.
- स्थगन प्रस्तावावर एक तास गोंधळ
अधिसभेच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतरच लगेचच नामविस्ताराचा स्थगन प्रस्ताव बैठकीसमोर आला. या प्रस्तावावर चर्चा करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने अधिसभा सदस्यांनी एक तास गोंधळ घातला. हा प्रस्ताव स्वीकारला आहे की नाही याची स्पष्टता द्या, हा नामविस्तार होणार नाही हे जाहीर करा, तसा ठराव करा यावर खडाजंगी झाली. अखेर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी स्थगन प्रस्तावातील सर्व मुद्दे चर्चेविना स्वीकारला. त्यानंतर सर्व अधिसभा सदस्यांनी कुलगुरुंचे अभिनंदन केले.








