कराड :
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार दिला. त्या विचारांची महाराष्ट्राला गरज आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, याची शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिली. जोपर्यंत मी राजकीय जीवनात आहे, तोपर्यंत त्यांची विचारधारा सोडणार नाही. याच विचारधारेने महाराष्ट्राचे भले होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने पवार यांनी समाधीस्थळी अभिवादन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार अमोल मिटकरी, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
अजितदादा म्हणाले की, अलिकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे काही लोक जी वक्तव्ये करतात, ती महाराष्ट्राला सहन होणारी नाहीत. यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे नेतृत्व करताना जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, याची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली असून नेत्यांनी बोलताना कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
कोयना धरणग्रस्तांनी शंभर टक्के पुनर्वसनासाठी प्रीतिसंगम बागेसमोर आंदोलन केले. त्याबाबत विचारले असता, अधिवेशन संपल्यानंतर तातडीने बैठक लावून धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील. वांग–मराठवाडी धरणग्रस्तांचे प्रश्नही मार्गी लावले जातील. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाबाबत समाजाला अभिमान वाटेल, असा निर्णय राज्य सरकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.
- राणेंच्या वक्तव्याचा हेतू समजला नाही
ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे, असा मुस्लीम समाज देशात, राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. आपण इतिहास पाहिला, पुस्तके वाचली तर लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आहे. त्यात मुस्लीम लोकही आहेत. त्यामुळे नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा काय हेतू आहे, ते समजले नाही. आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा मुस्लीम समाज हा देशप्रेमीच आहे, असे अजितदादांनी यावेळी सांगितले.








