हा जरा ढिम्म आहे. याला काही म्हणजे काही समजत नाही. याचं बघा काय ते. मला असं म्हणत एका हाताने श्रेयसला ओढतच त्याचे वडील आत आले. श्रेयसचा चेहरा भेदरलेला होता. ए..नीट बैस, पोक काढू नको. ताठ बसलं पाहिजे. पाय सरळ ठेव. असे एकामागून एक सूचना वजा हुकूमच ते श्रेयसला करत होते. त्यांच्या या हुकमांबरोबर श्रेयसचा चेहरा अगदी हिरमुसला झाला होता. मी शेवटी त्याच्या वडिलांना खोलीबाहेर बसायला सांगून दरवाजा लावून घेतला. तरीही श्रेयसची त्या बंद दाराकडे वारंवार नजर जात होती.
त्या दिवशी महेशची आई एकदम धाडकन् खोलीत शिरली आणि तिने तावातावाने एकदम बोलायला सुऊवात केली. माझा महेश कुणाच्याही उगीच खोड्या काढत नाही. बाकीची मुले उगीचच त्याच्या खोड्या काढतात. त्याच्या मॅडम म्हणाल्या, याला समुपदेशनाची गरज आहे. वेळेवर न्या कुणाकडेतरी. पण तो तसा गुणीच आहे खरंतर..अशी कथा आणि गुणगान सुरू असताना मला आधी भेटायला आलेल्या रीमाचा चष्मा पटकन् महेशने ओढला आणि खाली पाडला. परत खुर्चीत बसत टेबलाला असा काही धक्का दिला की टेबलवरचा पेनस्टॅण्ड आणि काही फाईल्सही झटक्मयात खाली पडल्या.
श्रेयस आणि महेश या दोघांच्याही वागणुकीला काही अंशी त्यांच्या पालकांची शिस्त वा बेशिस्तच कारणीभूत होती. बहुतांशवेळा मुलांमध्ये आढळणाऱ्या मनोविकृतींमध्ये त्यांच्या मूळ स्वभावासोबतच पालकांकडून मिळालेली वागणूक, शिस्त हा एक महत्त्वाचा घटक असतो.
काही पालकांचा असा गैरसमज असतो की शिस्त म्हणजे मुलांना सारखे धाकात ठेवणे. याउलट, काही पालक मुले म्हणतील ते प्रमाण असे करून मुलांना अति लाडावूनही ठेवतात.
खरंतर चांगलं वाईट, योग्य-अयोग्य याची समज काही जन्मजात नसते. ही समज येणं हा मुलांच्या मानसिक वाढीतला एक महत्त्वाचा घटक आहे. मुलांना भल्या बुऱ्याची, संयमाची, कर्तव्याची ओळख करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. शिस्त ही वागणुकीला मर्यादा आखून देते. पहा हं.. मीनाची आई दिवसभर खेळणाऱ्या मीनाला हाक मारते, मीने पुरे झालं खेळणं आता. अभ्यासाला बस पाहू. आता खेळ बंद करायला हवा आणि अभ्यासाला बसायला हवे हे मीनाच्या लक्षात येते. आई बाबांची हाक किंवा डोळे वटारणे हा शिस्तीचा भाग आहे. मुलांनी खेळावं कधी, अभ्यास कधी करावा, बाहेरच्या माणसांसमोर, पाहुण्यांसमोर कसं वागावं, स्वत:चे काम कसे उरकावे, नवीन गोष्टी कशाला आणि कशा शिकाव्यात, कसं व्यक्त व्हावं हे सर्व पालक हळूहळू मुलांना शिकवत असतात. स्वत:च्या वर्तनातून, काहीवेळा बोलताना उदाहरणे देऊन, चुकीच्या वागणुकीबद्दल नापसंती व्यक्त करून, योग्य वागणुकीला शाब्बासकी देऊन काय करावं, काय करू नये हे पालक मुलांना शिकवत असतात. खाताना सोबत असलेल्या सगळ्यासोबत वाटून खावं, मोठ्यांचा मान राखावा या गोष्टींची समज आपोआप जन्मताक्षणी येत नाही तर ती मुले पालकांच्या वर्तनातून, शिकवणुकीतून आत्मसात करत असतात. परंतु शिस्त म्हणजे केवळ शिक्षा नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यामध्ये प्रोत्साहन, उत्तेजन आणि अनुकरणही असते. मुलं ही अनुकरणशील असल्यामुळे आपल्याभोवतीची मोठी माणसे विशेषत: पालक जसे वागतात तसेच मुलेही वागतात. शिस्त म्हणजे केवळ मुलांना ‘होयबा’ करायला लावणेही नव्हे. मुलांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणे हे शिस्तीचे दुसरे खूप महत्त्वाचे ध्येय आहे. प्रौढपणी आढळणाऱ्या अनेक मनोविकृतींचे मूळ काहीअंशी बालपणी त्या व्यक्तीला मिळालेल्या वागणुकीतही पहायला मिळते.
छोट्या छोट्या चुकांबद्दल मुलांना कडक शिक्षा करणारे पालक मुलांचा आत्मविश्वास खच्ची करतात. पुढे पुढे मुलं सततच्या शिक्षेमुळे स्वत: प्रयत्न करायला घाबरू लागतात. मुलाला पालकांचे संरक्षण, मार्गदर्शन, मदत मिळत असली तरी अनेक गोष्टी मुलांनी स्वत:च शिकायच्या असतात. अशावेळी आत्मविश्वास ही महत्त्वाची शिदोरी असते. जी पालकांच्या प्रोत्साहनातून, उत्तेजनातून निर्माण होत असते. काहीवेळा मुलांच्या कुवतीचा विचार न करता आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, आकांक्षांच्या पूर्ततेसाठी मुलांकडून अपेक्षा केल्या जातात, हे करायलाच हवे अशी सक्ती केली गेली आणि त्याची पूर्तता करायला मुलांना जमले नाही तर मुलांचा आत्मविश्वास खचण्याची शक्मयता बळावते. काही पालक मुलांना, ‘शी, एवढं साधं तुला येत नाही. अगदीच फुकट हो तू. शाळेत शिकतोस तरी काय?’ किंवा dर‘अरेरे..काय हे. आरशात स्वत:ला पहा. काय तो काडीपैलवान. तो राम बघ कसा आहे तब्बेतीने.’ किंवा ‘किती तू काळी..ती रीमा किती छान आहे नाही’ अशा शेरेबाजीने वा तुलनेने मुले हिरमुसली होतात.
शिस्त हवी म्हणून सतत जर मुलांना बोलणी खावी लागत असतील तर आपण आईबाबांना आवडत नाही असे मुलांना वाटू लागते. आईवडील, पालक, वा मुलांच्या सहवासात येणारी इतर माणसे त्या मुलाकडे जसे पाहतात तसे तो स्वत:कडे पाहू लागतो. म्हणजे मी बुद्दू आहे, चांगला मुलगा आहे वगैरे. सतत कटू टीकेचे लक्ष्य झालेली मुले स्वत:वर प्रेम करू शकत नाहीत. त्यांच्या मनात स्वाभिमान उत्पन्न होत नाही.
आवश्यक तेवढा स्वाभिमान नसेल वा स्वाभिमानाचा अभाव असेल तर तिथे न्यूनगंड तयार होतो. जर आत्मविश्वासाचा अभाव असेल तर ती मुले भित्री, घाबरट होतात. पुढे हाच भित्रेपणा व्यक्तिमत्त्व विकासाच्या आड येऊ लागतो. काहीवेळा खूप टीकाटिप्पणी होणारी मुले नंतर आक्रमक, विध्वंसकही होण्याची शक्मयता असते.
आपले मूल आपले असले तरी ते एक स्वतंत्र आकार घेणारे व्यक्तिमत्त्व आहे हे पालक म्हणून आपण लक्षात घ्यायला हवे. मुलांकडे दुर्लक्ष करणे जसे घातक तसेच अती दक्षताही
घातकच.
मुलांना शाळा, अभ्यास यासोबतच बाह्यजगताची सजगतेने ओळख करून देणे गरजेचे आहे. विविध पुस्तके, खेळ, खेळणी, मित्र मैत्रिणी हेही यामध्ये मोलाची भूमिका बजावतात. मुलांवर सूचनांचा भडिमार न करता बोलायला हवे, त्यांचेही ऐकून घ्यायला हवे, जगातील विविध रंग, आकार, गंध, स्पर्श याचा अनुभव घेण्याची संधी त्यांना द्यायला हवी. रस्त्यामध्ये, बागेत, समुद्रावर येणारे आवाज, कधी नीरव शांतता याचा अनुभव मुलांना घेऊ द्या. मऊ, खरखरीत, गुळगुळीत हे स्पर्श कसे भिन्न आहेत, रिमझीम पाउस, पावसाची रिपरिप, मुसळधार पाऊस या साऱ्या छटा त्यांना अनुभवू दे. यातूनही मुले बरेच शिकत असतात.
एक पालक म्हणून तुम्ही मुलांचे भलेच चिंतीत असता परंतु सर्व गोष्टी आपल्याच मनासारख्या घडत नाहीत याचेही भान असू द्या. मुलांना माया, प्रेम, सुरक्षा, चांगले संस्कार द्या, परंतु स्वावलंबन आणि स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही द्या. एक लक्षात घ्यायला हवे की मुलांच्या यशाचा पतंग जर आकाशात उंच उडायचा असेल तर त्याला ढील देणे आवश्यक आहे. पालक म्हणून पतंगाचा दोरा आपल्या हातात असला तरी मांजाला थोडी ढील दिली तर तो पतंग अवकाशात उंच भरारी घेतो आणि तरीही तो त्या दोराने आपल्याजवळ बांधलेला राहतो. अगदी तसेच मुलांबाबत झाले तर मुलांना पालक पाल्य नात्याचा दोर बंधनाचा न वाटता आधाराचा वाटतो हे आपण लक्षात घ्यायला हवे हे मात्र निश्चित!
-अॅड. सुमेधा संजीव देसाई








