महिला एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या क्विनेन झेंगंवर मात
वृत्तसंस्था/ मेलबर्न
बेलारुसची स्टार टेनिसपटू आर्यना साबालेंकाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या किताबावर कब्जा केला आहे. शनिवारी झालेल्या फायनलमध्ये तिने चीनच्या क्विनवेन झेंगचा पराभव करत आपले दुसरे ऑस्ट्रेलियन ओपनचे टायटल जिंकले. तिने झेंगचा 6-3, 6-2 असा पराभव केला.
महिला एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या झेंगचा सामना बेलारूसच्या गतविजेत्या आर्यना साबालेंकासोबत होता. विशेष म्हणजे, झेंगने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. यंदाच्या स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या साबालेंकाने सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व गाजवले. 76 मिनिटे चाललेल्या या लढतीत तिने जराही चीनच्या झेंगला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. अखेरीस दोन सेटमध्येच साबालेंकाने चीनच्या झेंगला हरवले. प्रथमच अंतिम फेरीत खेळणाऱ्या झेंगच्या चेहऱ्यावर दडपण स्पष्टपणे दिसत होते, याचाच तिला फटका बसला.
2013 नंतर प्रथमच अशी कामगिरी
बेलारुसच्या 25 वर्षीय साबालेंकाने गतवर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर यंदाच्या वर्षीही तिने धमाकेदार कामगिरी करत जेतेपद आपल्याकडेच राखले. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावत तिने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. 2013 नंतर या स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. याआधी बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने 2012 व 2013 मध्ये या स्पर्धेत जेतेपद मिळवले होते.









