वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरु असलेल्या एस. एम. कृष्णा स्मृती खुल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताचा नवोदित युवा टेनिसपटू आर्यन शहाचे एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. तर आर्यन शहा आणि करणसिंग यांनी या स्पर्धेत दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या ऑलिव्हर क्रेफोर्डने आर्यन शहाचा 6-3, 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. अहमदाबादच्या 19 वर्षीय आर्यन शहाने आयटीएफ एम-25 अहमदाबाद खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्याने सलग 14 एकेरी सामने जिंकले होते. आपण नजिकच्या काळात सरावावर अधिक भर देत आपल्या मानांकनात सुधारणा करण्यासाठी परिश्रम घेईन, असे आर्यन शहाने म्हटले आहे.









