निमंत्रितांच्या स्पर्धेत 16 संघांचा सहभाग
बेळगाव : मन्नूर येथील धर्मरक्षक ग्रुप आयोजित निमंत्रितांच्या आंतरराज्य व गाव मर्यादित व्हॉलीबॉल स्पर्धांचे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. गाव मर्यादित स्पर्धेत आर्यन बॉईज संघाने धर्मरक्षक ब संघाचा 3-2 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. मन्नूर येथील खुल्या मैदानावर आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या व गाव मर्यादित व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कर्नाटक राज्य युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मुकुंद तरळे, अशोक चौगुले, एस. एल. चौगुले, ग्रा. पं. सदस्य पुंडलिक भांदुर्गे, सरिता नाईक, लता कडोलकर, लक्ष्मी सांबरेकर, जयश्री तोरे सचिता सांबरेकर, रामा चौगुले, दत्तू चौगुले आदी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन मृणाल हेब्बाळकर यांनी केले. मुकुंद तरळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. पुंडलिक भांदुर्गे व एस. एल. चौगुले यांच्या हस्ते नेटवरील चेंडूचे फीत सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
गाव मर्यादित स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आर्यन बॉईजने क्लासिक बॉईजचा 15-10, 11-15, 15-10 अशा गुण फरकाने तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धर्मरक्षक ग्रुप अ संघाने आर्यन बॉईज ब संघाचा 15-10, 13-15, 15-11 अशा सेट्समध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात आर्यन बॉईजने धर्मरक्षक संघाचा 15-10, 15-9 अशा सेट्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर अरुण कदम, अशोक चौगुले व मनोहर कदम आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आर्यन बॉईज संघाला 3 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. या निमंत्रितांच्या स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला असून त्यामध्ये डीवायईएस (बेळगाव), शौर्य स्पोर्ट्स (खानापूर), ऑरेंज आर्मी (कुमठा) सह 16 संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी हर्षवर्धन शिंगाडे, शंकर कोलकार, राजू चौगले आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश मजूकर, उमेश बेळगुंदकर यांनी काम पाहिले.









