नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिल्लीत मोठा बदल करत अरविंदर सिंह लवली यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लवली यांना दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. यापूर्वी हे पद अनिल चौधरी यांच्याकडे होते. अरविंदर सिंह लवली हे मूळचे पंजाबच्या लुधियानाचे असले तरीही त्यांचे शिक्षण दिल्लीत पार पडले आहे. 1992-96 पर्यंत लवली यांनी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयचे राष्ट्रीय महासचिव म्हणून काम केले होते. 1998 मध्ये अरविंदर सिंह लवली हे दिल्लीच्या गांधीनगर मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी ते दिल्ली विधानसभेतील सर्वात कमी वयाचे सदस्य ठरले होते. शीला दीक्षित यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद सांभाळले होते. दिल्लीचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील मुलांसाठी 20 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शाळांमध्ये कॉम्प्युटरचे शिक्षण प्रदान करण्याचा निर्णय घेणारे पहिले राज्य म्हणून दिल्लीला मान त्यांच्याच मंत्रिपदाच्या कार्यकाळात मिळाला होता. 2017 मध्ये दिल्ली महापालिका निवडणुकीवेळी लवली यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु सुमारे वर्षभरातच त्यांनी भाजपला रामराम ठोकून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Previous Articleभारत-विंडीज निर्णायक तिसरा वनडे सामना आज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









