वृत्तसंस्था/प्राग
प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने अनीश गिरीच्या बचावफळीला भेदत एकट्याने अव्वल स्थानावर जाण्यात यश मिळविले आहे. दुसरीकडे, आर. प्रज्ञानंदने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किताबाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या चीनच्या वेई यीशी बरोबरी साधली. अरविंदने पाच गुण मिळवले असून आता प्रज्ञानंदवर अर्ध्या गुणाची आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंदला आता त्याच्याशी बरोबरी साधण्याच्या किंवा त्याला मागे टाकण्याच्या दृष्टीने विशेष जोर लावावा लागेल. स्पर्धेत फक्त दोन फेऱ्या बाकी आहेत. अन्य सामन्यांत अमेरिकेच्या सॅम शँकलँडने व्हिएतनामच्या क्वांग लेम लेचा पराभव केला. रंजक गोष्ट म्हणजे क्वांग लेम आणि गिरी या दोघांनीही त्यांचे पहिले सहा गेम बरोबरीत सोडविले आणि त्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दुसऱ्या निर्णायक सामन्यात तुर्कीच्या 16 वर्षीय गुरेल एडीझने स्थानिक गुयेन थाई दाई व्हॅनला नमविले, तर झेक रिपब्लिकच्या डेव्हिड नवाराने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरशी बरोबरी साधली. अरविंद (5 गुण) व प्रज्ञानंद (4.5 गुण) यांच्या मागे वेई यी, एडिझ, कीमर आणि शँकलँड (प्रत्येकी 3.5 गुण) हे चार खेळाडू असून गिरी, नवारा आणि ले हे त्यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहेत. दाई व्हॅन आता 2.5 गुणांसह तळाशी आहे. चॅलेंजर्स विभागात जोनास बुहल बजेरेने दिव्या देशमुखला पराभूत करून तिच्या अडचणीत भर घातली आहे. सात सामन्यांतून 1.5 गुणासह दिव्या शेवटच्या स्थानावर आहे. या विभागात उझबेकिस्तानच्या बजेरे आणि नोदिरबेक याकुबबोएव्ह यांनी प्रत्येकी 5.5 गुणांसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळविलेले आहे.









