ऑनलाईन टीम/तरुण भारत
Arvind Kejriwal Statement : दिल्लीत एमसीडी निवडणुकांची (Delhi MCD Election) रणधुमाळी सुरु आहे. एमसीडी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न सुरु आहेत. गेल्या १५ वर्षांपासून एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर आम आदमी पार्टीचं (Aam Admi Party) मोठं आव्हान आहे. दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी (CBI, ED) माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप (BJP) तुरुंगात जाईल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून एमसीडीमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपपुढे आता आम आदमी पार्टीचे कडवे आव्हान असणार आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही एमसीडीला गेल्या ५ वर्षांत १ लाख कोटी रुपये दिले, पण या लोकांनी सर्व पैसे खाऊन टाकले. यांनी थोडंतरी काम केलं असतं, तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असता.
भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले
सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की,“एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्याकडे सोपवा, अर्धी भाजप तुरुंगात जाईल. त्यांच्याकडे तपास यंत्रणा आहेत. आमच्यावर अनेक खटले दाखल झाले, मात्र काहीही सिद्ध होऊ शकलं नाही. हे लोक सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणतात. मनीषनं दारू घोटाळा केला, १० कोटी खाल्ल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतके छापे टाकूनही काही सापडलं नाही, मग १० कोटी रुपये गेले कुठे?” ते पुढे म्हणाले की, “हेच खरे भ्रष्टाचारी आहेत. गुजरातमध्ये त्यांनी घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला पूल बांधण्याचं कंत्राट दिलं. जगात कुठेही असं काही पाहिलेलं नाही. फक्त एका दिवसासाठी सीबीआय-ईडी आमच्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल.”