रुग्णालयात जात केली प्रकृतीची विचारपूस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची रुग्णालयात जात भेट घेतली आहे. रुग्णालयात सत्येंद्र जैन यांची त्यांनी गळाभेट घेतली आहे. आज मी एका शूर व्यक्तीला भेटलो असे म्हणत केजरीवालांनी जैन यांना ‘हिरो’ संबोधिले आहे. जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन दिला आहे.
आम आदमी पक्षाने ट्विटरवर केजरीवाल आणि जेन यांच्या भेटीची छायाचित्रे शेअर केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह 11 जुलैपर्यंत जैन यांना जामीन दिला आहे. जैन यांना या कालावधीत स्वत:च्या मर्जीने रुग्णालयात उपचार करविण्याची सूट मिळाली आहे. अंतरिम जामिनासाठीच्या अटी सत्र न्यायालय निश्चित करणार आहे. वैद्यकीय अहवाल 10 जुलै रोजी सादर करण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अंतरिम जामिनाच्या कालावधीत जैन यांना प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही. तसेच कुठल्याही साक्षीदाराला प्रभावित करता येणार नाही.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन हे तिहार तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वी तुरुंगातील बाथरुममध्ये ते कोसळले होते. यामुळे जखमी झालेल्या जेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









