वृत्तसंस्था / .नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यातील शब्दयुद्धही पेटत चालले आहे. आम आदमी पक्षाला पुन्हा दिल्लीची सत्ता मिळाल्यास दिल्लीतील हिंदू पुजारी आणि शीख ग्रंथी यांनाही महिना 18 हजार रुपयांचे मानधन दिले जाईल, असे आश्वासन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिले होते. ही योजना क्रियान्वित झाल्याची घोषणा त्यांनी हनुमान मंदिरात केली. त्यांची ही योजना फसवी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली असून केजरीवाल हे केवळ हिंदू आणि शीखांची फसवणूक करण्यासाठी अशी आश्वासने देत आहेत. अरविंद केजरीवाल हे केवळ ‘निवडणूक हिंदू’ आहेत. निवडणुकीपुरता त्यांना हिंदू धर्म आठवतो, अशी टिप्पणीही भारतीय जनता पक्षाने मंगळवारी केली आहे.
केजरीवाल यांच्या पक्षाने या योजनेच्या संदर्भात एक पोस्टरही प्रसिद्ध केले आहेत. या पोस्टरमध्ये केजरीवाल हे एका हिंदू पुजाऱ्याच्या वेषभूषेत दाखविण्यात आले आहेत. त्यांची ही वेषभूषा ‘भूल भूलैय्या’ या हिंदी चित्रपटातल्या राजपाल यादव या नायकाच्या वेषभूषेप्रमाणे आहे. त्यावरुनही भारतीय जनता पक्षाने केजरीवाल यांची खिली उडविली. केजरीवाल यांचे 18 हजार रुपये प्रतिमहिना हे आश्वासनही या ‘भूल भूलैय्या’सारखेच आहे, अशी टपली या पक्षाने लगावली.
मुस्लीमांच्या लांगूलचालनाचा आरोप
केजरीवाल हे गेली 10 वर्षे मुस्लीम मौलवींना वेतन देत आहेत. या दहा वर्षांमध्ये त्यांना हिंदू पुजारी आणि शीख गंथी यांची आठवण झाली नाही. आता आगामी निवडणुकीत त्यांची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना हिंदू आणि शीख मतांची आठवण होत आहे. केजरीवाल यांनी रामजन्मभूमीच्या स्थानी भगवान रामलल्ला यांचे भव्य मंदीर साकारण्यास विरोध केला होता. हिंदूंची मंदिरे आणि शीखांचे गुरुद्वारा यांच्या जवळ केजरीवाल यांच्या सरकारने दारुचे गुत्ते आणि बार उघडण्यासाठी अनुमती दिली. हिंदूंच्या धर्मभावना दुखावतील, अशी सर्व कृत्ये ज्या केजरीवाल यांनी प्रछन्नपणे केली, तेच आता हिंदू-शीखांसंबंधी खोटा पुळका दाखवित आहेत, असेही भारतीय जनता पक्षाने प्रतिपादन केले आहे.
काँग्रेसकडूनही केजरीवाल धारेवर
काँग्रेस पक्षानेही केजरीवाल यांना धारेवर धरले आहे. केजरीवालांना ही निवडणूक जिंकण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे ते आश्वासनांची खैरात करत सुटले आहेत. त्यांनी धर्माचा उपयोगही आपल्या निवडणुकीसाठी करीत आहेत. तथापि, ते मनातून हादरले आहेत, अशी खिल्ली काँग्रेसनेही उडविली आहे.
इमामांकडून केजरीवाल यांचा निषेध
केजरीवाल यांनी मशिदींच्या इमामांना आणि मौलवींना वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप इमाम किंवा मौलवींना ही रक्कम मिळालेलीच नाही. केवळ हे आश्वासन कागदोपत्री राहिले आहे, अशी टीका दिल्लीतील इमांमांच्या संघटनेने केली. या संदर्भात त्यांनी इमामांच्या मागण्यांसाठी मोर्चाही काढला होता.









