► वृत्तसंस्था/ जयपूर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी राजस्थान दौऱ्यावर होते. त्यांनी श्रीगंगानगर येथे आम आदमी पक्षाच्या सभेला संबोधित करताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते. आम आदमी पक्ष राज्यात विधानसभेच्या 200 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याची घोषणा पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच केली होती. पक्ष दीर्घकाळापासून राज्यात आपली संघटना मजबूत करण्यात गुंतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या उद्देशाने येथे राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या रविवारच्या सभेत वीज, पाणी, शिक्षण, पेपरफुटी, भ्रष्टाचार यासारख्या मुद्यांवर भाष्य करत केंद्र आणि राज्य सरकारला टार्गेट केले.









