वृत्तसंस्था /अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीशी निगडित गुजरात विद्यापीठाच्या मानहानी प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. अहमदाबाद येथील सत्र न्यायालयाने समन्सला स्थगिती देण्याची मागणी करणारी त्यांची याचिका फेटाळली आहे. सत्र न्यायालयाकडुन जारी करण्यात आलेल्या समन्सला केजरीवालांनी आव्हान दिले होते. न्यायालयाने केजरीवाल आणि आप खासदार संजय सिंह यांच्या पुनर्विचार याचिकेला फेटाळले आहे. अशा स्थितीत केजरीवाल आणि संजय सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन्ही नेत्यांना पुढील सुनावणीवेळी न्यायालयासमोर हजर रहावे लागण्याची शक्यता आहे. गुजरात विद्यापीठ राज्य सरकारच्या अधीन आहे. यामुळे विद्यापीठ मानहानीचा दावा करू शकत नाही असा युक्तिवाद केजरीवाल यांच्यावतीने करण्यात आला होता. आमचे सर्व निर्णय सरकार घेत नाही. अशा स्थितीत आम्हाला ‘स्टेट’ या श्रेणीत राखता येणार नसल्याचा प्रतियुक्तिवाद विद्यापीठाकडून करण्यात आला. अहमदाबादच्या सत्र न्यायालयात 23 सप्टेंबर रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.









