वृत्तसंस्था/ प्राग
येथे सुरू असलेल्या प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सलग दुसरा सामना अनिर्णीत राखला तर भारताच्या अरविंद चिंदबरमने दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेन्ट केमरचा बचाव भेदत शानदार विजय नोंदवला.
निवडक खेळाडूंच्या सर्कलमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असणाऱ्या चिदंबरमने काळ्या मोहरांनी खेळताना पहिला विजय मिळविला. पहिल्या फेरीत त्याला झेकच्या एन्ग्युएन थाइ दाइ व्हानविरुद्ध बरोबरीसाठी बराच संघर्ष करावा लागला. 10 खेळाडूंचा सहभाग असलेल्या राऊंड रॉबिन पद्धतीच्या स्पर्धेतील या फेरीत केवळ एकच सामना निकाली झाला. अन्य सर्व सामने अनिर्णीत सुटले. दाइ व्हानने अमेरिकेच्या सॅम शांकलँडला बरोबरीत रोखले. त्याचा हा दुसरा अनिर्णीत सामना होता. अग्रमानांकित चीनच्या वेइ यि याने आपले खाते खोलताना हॉलंडच्या अनीश गिरीला बरोबरीत रोखले.
या स्पर्धेच्या अजून सात फेऱ्या बाकी असून चिदंबरम, शांकलँड 1.5 गुणांसह आघाडीवर आहेत तरगिरी कुआंग लेइम ली, दाइ व्हान, डेव्हिड, केमर, प्रज्ञानंद, एडिझ, वेइ यी अर्ध्या गुणासह शेवटच्या स्थानावर आहेत.









