वेंगुर्ले (वार्ताहर)-
आरवली श्री वेतोबा देवस्थानला ‘आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. बेळगांव येथे शनिवारी आयोजित विशेष कार्यक्रमात गोवा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते देवस्थान कमिटी अध्यक्ष जयवंत राय व अन्य पदाधिकारी यांच्याकडे हा आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
आरवली श्री वेतोबा देवस्थानच्या धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगांव व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आरवली श्री वेतोबा देवस्थानची आंतरराज्य पुरस्कारासाठी, पुरस्कार निवड समिती बेळगांवतर्फे निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वेतोबा देवस्थान कमिटीचे विश्वस्त जयवंत राय, डॉ. प्रसाद साळगांवकर, देवस्थान कमिटीचे सेक्रेटरी आबा टांककर, सामाजिक कार्यकर्ते व आरवलीचे माजी उपसरपंच मयूर आरोलकर, पोलिसपाटील मधुसूदन मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी कर्नाटक माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, बेळगाव माजी खासदार अमरसिंह पाटील, गुलबर्गा जिल्हा पोलिसप्रमुख महेश मेघण्णावर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यातील 150 व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.









