गृहमंत्र्यांच्या दौऱयावरील चिनी आक्षेपाला भारताचे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱयावरील चीनचे आक्षेप भारताने मंगळवारी फेटाळून लावले आहेत. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून कायम राहणार आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱयावर आक्षेप घेण्याचे कुठलेच कारण नाही आणि असे करून वस्तुस्थिती बदलणार नाही. चिनी अधिकाऱयांची टिप्पणी आम्ही फेटाळून लावत आहोत. भारतीय नेते अन्य राज्यांप्रमाणेच अरुणाचल प्रदेशचा नियमित स्वरुपात दौरा करत असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेशमधील सीमावर्ती गाव किबिथूमध्ये ‘वायब्रेंट व्हिलेज’ कार्यक्रमाचा शुभारंभ करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी भारताच्या भूमीवर अतिक्रमण करण्याचा काळ केव्हाच संपला असल्याचा स्पष्ट संदेश चीनला दिला होता.
भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याचे दुस्साहस आता कुणीच करूच करू शकत नाही. भारताची इंचभर भूमी देखील कुणी बळकावू शकणार नाही हे सैन्य आणि आयटीबीपीने सुनिश्चित केल्याचे शाह यांनी म्हटले होते. तर गृहमंत्री शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱयावर चीनकडून टीका करण्यात आली होती. मागील आठवडय़ात काही ठिकाणांना चीनकडून नावे देण्याचा प्रकार भारताने फेटाळला होता.









