चीनकडून पुन्हा आगळीक : भारताला शांत राहण्याची केली इशारावजा सूचना
वृत्तसंस्था/ बीजिंग
अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला स्वत:च्या नकाशात दाखविणारा चीन आता स्वत:च्या या कृत्याला वैध ठरवू पाहत आहे. चीनच्या नकाशाची 2023 मधील आवृत्ती जारी करणे सामान्य प्रक्रिया आहे. अरुणाचल आणि अक्साई चीन हे कायदेशीरदृष्ट्या आमचेच आहेत. संबंधित पक्ष (भारत) या मुद्द्यावर शांत राहून अधिक बोलणे टाळेल अशी अपेक्षा असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांनी बुधवारी म्हटले आहे.
चीनने 28 ऑगस्ट रोजी स्वत:चा नकाशा जारी केला होता. यात भारताचा अरुणाचलप्रदेश, अक्साई चीन तर तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्री क्षेत्राला स्वत:च्या क्षेत्रात दर्शविण्याची आगळीक चीनने केली होती. चीनची ही जुनी सवय असून त्याच्या दाव्यांनी काहीच होणार नाही असे प्रत्युत्तर भारताच्या विदेश मंत्र्यांनी चीनला दिले होते.
अक्साई चीन आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. यापूर्वीही चीनने भारतीय हिस्स्यांवर स्वत:चा दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्याच्या दाव्यांना काहीच अर्थ नाही. आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. निरर्थक दावे करून इतरांच्या भूभागांवर मालकी सांगता येत नसल्याचे म्हणत जयशंकर यांनी चीनला फटकारले होते.









