हातकणंगले /प्रतिनिधी
हातकणंगले नगरपंचायतीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर (वय वर्ष – ५० ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सकाळी नेहमीप्रमाणे नाश्ता करून कामासाठी बाहेर निघताना गाडीत बसल्यावर त्यांना जोरात खोकला आला त्याचवेळी त्यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ इचलकरंजी येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनानंतर हातकणंगले शहरावर शोककळा पसरली असून शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते असून आम.राजूबाबा आवळे व माजी मंत्री सतेज पाटील यांचे खंदे समर्थक होते . तसेच माजी जि. प. सदस्या अर्चना जानवेकर यांचे पती असून त्यांच्या पश्चात आई ,वडील , भाऊ , बहीण , भावजय , मुलगा , मुलगी असा परिवार आहे.