माजी निवडणूक आयुक्त : लोकसभा निवडणुकीपूर्वी दिला होता राजीनामा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांना क्रोएशियातील भारताचा पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विदेश मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे. गोयल हे निवृत्त अधिकारी आहेत. अरुण गोयल हे लवकरच राजदूत पदाचा कार्यभार सांभाळतील. अरुण गोयल यानी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली हेती. त्यांचा कार्यकाळ 5 सप्टेंबर 2027 पर्यंतचा हेता. तसेच ते पुढील वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त झाले असते. परंतु राजीनाम्याचा निर्णय घेत त्यांनी सर्वांना धक्का दिला होता.
निवडणूक आयुक्ताच्या स्वरुपातील गोयल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली होती. स्वायत्त संस्थांवरील प्रहार बंद न झाल्यास लोकशाही हुकुमशाहीत बदलण्यास वेळ लागणार नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. तर दुसरीकडे गोयल यांना निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यावरूनही वाद निर्माण झाला होता. यावरून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
अरुण गोयल यांना नोव्हेंबर 2022 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मार्च 2024 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यापूर्वी पंजाब कॅडरच्या 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली होती.









