गोकुळच्या नूतन अध्यक्षपदी अरुण डोंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील 2 वर्षांसाठी डोंगळे हे अध्यक्ष असणार आहेत. संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळच्या 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत सतेज पाटलांनी महाडिक गटाची सत्ता उलथवून लावली होती. त्यानंतर जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार दोन वर्षानंतर आता अरुण डोंगळे यांना संधी देत अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सतेज पाटील यांनी महाडिक गटातून आपल्या गटात सामील झालेल्या डोंगळे आणि विश्वास पाटील यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी देणार असल्याचे निवडणुकीनंतर जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या दोन वर्षामध्ये विश्वास पाटील यांनी जबाबदारी पार पाडली तर आता अरुण डोंगळे यांना ठरल्याप्रमाणे अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अरुण डोंगळे हे दुसऱ्यांदा गोकुळ चे अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी सुद्धा 2010 ते 2013 मध्ये ते गोकुळचे अध्यक्ष राहिले आहेत.
दरम्यान, गोकुळ दूध संघावरती यापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता होती. यावेळी सुद्धा विश्वास नारायण पाटील यांना दोन वेळा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली तर अरुण डोंगळे यांनाही एकदा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र हे दोघेही गोकुळच्या सत्तांतरामध्ये महत्वाचे शिलेदार असल्याने सतेज पाटील गटाकडून त्यांनाच अध्यक्ष पदाचे दावेदार मानले गेले होते. त्यानुसार आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे जिल्ह्याचे सत्ताकेंद्र असणाऱ्या गोकुळवर अरुण डोंगळे यांना अध्यक्ष करून आपला शब्द पळाला आहे.
गोकुळचे सत्तांतर झाल्यानंतर विरोधी गटाच्या संचालिका शौमिक महाडीक यांना गोकुळमधून माहितीच्या अधिकारात कागदपत्रे सुद्धा मिळाली नाहीत. किंबहुना अनेकवेळा त्यांना विचारण्यात आलेली माहिती सुद्धा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर गोकुळ मध्ये सुरू असणाऱ्या मनमानी आणि गैर कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट राज्य शासनाकडे तक्रार करत गोकुळची चाचणी लेखापरिक्षणाची मागणी केली. त्यानुसार चाचणी लेखापरिक्षण सुरू आहे. त्यातच आता नव्या अध्यक्षांसमोर याचे आव्हान असणार आहे मात्र गोकुळचे अभिनेता आणि विलन बदलले आहेत मात्र आम्ही याच खुर्चीवर आहे त्यामुळे कर नाही तर डर कशाला असेही डोंगळे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतात डोंगळे यांनी 20 लाख लिटर दुध संकलनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. मात्र अनेक तांत्रिक संकटांबरोबरच राजकीय आव्हानांना पार करत डोंगळे उद्दिष्ट पार करतात का हेच पाहावे लागणार आहे.