पुणे येथील आर्ट बिट्स फाऊंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार
ओटवणे प्रतिनिधी
झाराप येथील कला शिक्षक विष्णु गंगाराम माणगावकर यांना कला क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल पुणे येथील आर्ट बिट्स फाऊंडेशनचा राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.आर्ट बिटस् फौंडेशन ही संस्था गेली २३ वर्षे सातत्याने कलाकारांना प्रोत्साहन तसेच उत्तम व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत आहे. चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य, लोककला तसेच इतर सर्व कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना आर्ट बिटस् फौंडेशन या संस्थेमार्फत पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विष्णू माणगावकर हे चित्रकला क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत अनेक नवोदित चित्र व मूर्ती कलाकारांना मार्गदर्शन करीत आहेत. सध्या ते सावंतवाडीतील सेंट्रल इंग्लिश स्कूल येथे कला शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. या कलेच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांचे उल्लेखनिय योगदान आहे. यापुर्वी त्यांना गोवा व महाराष्ट्र राज्य कला संचालनालयांच्या वतीने महाराष्ट्र कला गौरव सन्मान , कलाश्री, राज्यस्तरीय युवा चित्रकार, कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता या कलेतील त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कला क्षेत्रातील हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.









