राज्य सरकारची प्रयोगाला अनुमती, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सरकारने अनुमती दिली आहे. त्यामुळे लवकरच यासंबंधीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पावसाअभावी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. पावसाअभावी राज्यातील 195 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यामधून बेळगाव व खानापूर तालुक्यांना वगळण्यात आले आहे. अथणी, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती, कित्तूर, निपाणी, कागवाड, मुडलगी, यरगट्टी हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. बेळगाव व खानापूर तालुक्यातही दरवर्षीच्या तुलनेने यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी 7 सप्टेंबर रोजी सरकारला पत्र पाठविले होते. महसूल खात्याने या प्रयोगाला अनुमती दिली आहे. शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले असून ‘ख्याती क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टन्स’ (एलएलपी) ही कंपनी बेळगाव शुगर्स प्रा. लि. च्या सहकार्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. यासाठी लागणारा खर्चही स्वत: संस्था करणार आहे. या प्रयोगाला सरकारने अनुमती दिली असून प्रयोग राबविताना जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यापूर्वीही बेळगाव जिल्ह्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग अनेकवेळा राबविण्यात आले आहेत. आता सरकारने परवानगी दिल्यामुळे लवकरच यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.









