एआयबद्दल सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता : अनेक पेशांमध्ये संकट निर्माण होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या वेगाने होत असलेल्या आविष्कारामुळे अनेक सुविधा मिळत असल्या तरीही रोजगाराशी संबंधित चिंता लोकांना सतावू लागली आहे. या चिंतेत आता सर्वोच्च न्यायालयही सामील झाले आहे. न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भविष्यात चालकाचे काम एआयने होणार असल्याचे म्हणत याचे धोकादायक परिणाम होतील आणि मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार होऊ शकतील अशी भीती व्यक्त केली.
न्यायाधीश सूर्यकांत आणि एन. के. सिंह यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे उद्गार काढले आहेत. याचिकेत सरकारला इलेक्ट्रिकल्स व्हेइकल्सची खरेदी आणि त्याच्या वापराला प्रोत्साहित करणारे धोरण निर्माण करण्याचा निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने लोकांचे रोजगार जाऊ नयेत. भारतात चालकाची नोकरी देखील रोजगाराचे एक मोठे माध्यम आहे. एआयशी आता वकिलांनाही स्पर्धा करावी लागणार आहे. कुठलाही कायदेशीर सल्ला देणारे टूल आता उपलब्ध झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स वेगाने वाढणारे तंत्रज्ञान आहे. काही महिन्यांमध्ये एक चांगले मॉड्यूल येते. एआय आधारित अॅडव्होकेट टूल असल्याचे आम्ही सध्या पाहत आहोत. अमेरिकेत याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय असे खंडपीठाने नमूद केले. कॉन्टेंट रायटिंग, कन्सल्टेंसी समवेत अनेक व्यवसायांवर एआयमुळे प्रतिकूल प्रभाव पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.









