संशोधनामुळे दुर्लभ रक्तगट असलेल्या लोकांना मदत
जगात पहिल्यांदाच प्रयोगशाळेत निर्मित रक्त रुग्णांना देण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या वैद्यकीय परीक्षणात हे यश मिळाले आहे. कॅम्ब्रिज आणि ब्रिस्टल युनिव्हर्सिटीसह अनेक संस्थांचे वैज्ञानिक या परीक्षणात सामील आहेत. या संशोधनामुळे रक्तविषयक आजार आणि दुर्लभ रक्तगट असलेल्या लोकांवरील उपचारात मदत होणार असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
प्रयोगशाळेत रक्त तयार करणाऱया या प्रक्रियेत रेड ब्लड सेल्स (लाल रक्तपेशी)वर लक्ष केंद्रीत केले जाते. या रेड ब्लड सेल्स फुफ्फुसांपासून ऑक्सिजन प्राप्त करत शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवित असतात. वेज्ञानिक सर्वप्रथम एका व्यक्तीकडून सामान्य रक्तदान करवितात, याचे प्रमाण सुमारे 470 मिलिमीटर असते. त्यानंतर रक्तनमुन्यांमधून स्टेम सेल्सना वेगळे करण्यात येते, याच स्टेम सेल्स नंतर लाल रक्तपेशी होऊ शकतात. स्टेम सेल बोन मॅरोमध्ये असतात. ज्यांच्यामुळे रक्तातील तीन महत्त्वाच्या पेशी रेड ब्लड सेल, व्हाइट ब्लड सेल आणि प्लेटलेट्स तयार होत असतात.
पुढील टप्प्यात वैज्ञानिक स्टेम सेल्सना प्रयोगशाळेत मोठय़ा प्रमाणात विकसित करतात. त्यानंतर त्यांना रेड ब्लड सेल्समध्ये रुपांतरित करण्यासाठी निर्देशित केले जाते. पूर्ण प्रक्रियेला सुमारे 3 आठवडय़ांचा कालावधी लागतो आणि यादरम्यान 5 लाख स्टेम सेल्सपासून 50 अब्ज रेड ब्लड सेल्स तयार होतात. यातील 15 अब्ज रेड ब्लड सेल्सना फिल्ट केले जाते, त्यांचा वापर प्रत्यारोपणाकरता केला जाऊ शकतो.

संशोधनात सध्या 2 जणांना सामील करण्यात आले आहे. परंतु पूर्ण परीक्षण 10 तंदुरुस्त व्यक्तींवर करण्यात येईल. त्यांना 4 महिन्यांच्या अंतराने 5 ते 10 मिलिमीटरचे दोन ब्लड डोनेशन देण्यात येतील. यातील एक नॉर्मल ब्लड तर दुसरे प्रयोगशाळेत तयार केलेले रक्त असणार आहे. प्रयोगशाळेतील रक्तात रेडिओऍक्टिव्ह (किरणोत्सर्गी) सब्स्टेंस देखील असून त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवला जाणार असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
120 दिवसांचा कालावधी
सर्वसाधारणपणे लाल रक्तपेशी शरीरात 120 दिवस टिकतात. त्यानंतर त्यांची जागा नव्या पेशी घेत असतात. सामान्य दानात मिळणाऱया रक्तात नव्या आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या लाल रक्तपेशी असतात. परंतु प्रयोगशाळेत तयार करण्यात ालेल्या रक्तातील पेशी पूर्णपणे नव्या आहेत. याचमुळे या पेशी 120 दिवस टिकतील अशी वैज्ञानिकांना अपेक्षा आहे. यामुळे भविष्यात रुग्णांना कमी प्रमाणात ब्लड डोनेशन्सची गरज भासणार आहे.
नव्या रक्ताचे मूल्य
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस ब्लड अँड ट्रान्सप्लांटनुसार एका सरासरी ब्लड डोनेशनची किंमत 145 युरो म्हणजेच 13,666 रुपये असते. प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱया रक्ताची किंमत याहून अधिक असणार आहे. अद्याप या तंत्रज्ञानाची कुठलीच किंमत निर्धारित करण्यात आलेली नाही. परंतु या तंत्रज्ञानाचा विकास होत जाण्यासह याचा खर्चही कमी होत जाणार असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.









