सौ. मंगल नाईक-जोशी
सावंतवाडी
असंख्य जीव जगतात, ‘चिरंजीवी’ काहीच राहतात. कलाकृती अमाप असतात, स्मरणशक्तीत केवळ उल्लेखनीय, वैशिष्ट्यपूर्ण तेवढ्याच राहतात. मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ नाट्यकृती अशीच एकमेवाद्वितीय ठरली!! यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेले सिध्दहस्त साहित्यिक, नाटककार किती विनयशील असू शकतात ! इतरांच्या पाठीवर हात ठेवून ‘पुढे चल’ म्हणण्याचा आशीर्वाद किती उदारपणे देऊ शकतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘वस्त्रहरण’चे लेखक, नाटककार श्री. गंगाराम गवाणकर हे व्यक्तिमत्व होते. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना प्रेम दिलेच. पण कोकणवासीयांनी जाणीवपूर्वक त्यांचे आजन्म स्मरण ठेवलेच पाहिजे, एवढे महत्तम कार्य त्यांच्याकडून कोकणच्या संस्कृतीसाठी घडले आहे. मालवणी बोलीभाषेला आज सन्मान मिळतो. ही बोलीभाषा अनेक प्रांतांतून आवडीने ऐकली जाते. शहरांमध्ये राहणाऱ्या मालवणी माणसाला ती अभिमानाने मिरवावीशी वाटते. या भाषेतून बऱ्याच साहित्यकृतीची निर्मिती होऊन ती लोकप्रिय होते. समाजमाध्यमांवर मालवणीचा डंका वाजतो. या सर्वच झक्कास परिणामांचे मूळ अर्थातच ‘वस्त्रहरण’ नाट्यप्रयोगात आहे. या नाट्यकृतीचे जन्मदाते श्री. गंगाराम गवाणकर यांचे मालवणी बोलीभाषेचा प्रचार-प्रसार, संवर्धन यात अनमोल योगदान आहेच. त्याचबरोबर मातृभाषा मराठीतूनही त्यांनी केलेली साहित्यसेवा, नाट्यसेवा दुर्लक्षिता येणार नाही. त्यामुळेच त्यांची निधनवार्ता प्रत्येक मराठी मनाला दुःखद चटका लावून गेली.सावंतवाडी येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्व. गंगाराम गवाणकर अर्थात ‘नाना’ यांनी भुषविले. या कोकणरत्नाच्या सस्नेह उपस्थितीने त्यादिवशी येथील ‘नरेंद्र’ ही पुलकित झाला होता. अवघी सुंदरवाडीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत करीत होता. त्यांच्यावर प्रेमवर्षाव करणाऱ्या साहित्य-नाट्यप्रेमींना येथे त्यांचे व्यक्तिमत्व जवळून अनुभवता आले. त्यांचे बोल प्रत्यक्ष ऐकता आले. संपूर्ण दिवस नाना या संमेलनात उपस्थित होते. सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधत होते. त्यांच्यातून एका निगर्वी, दिलखुलास, प्रतिभावंत लेखकाचे, कसदार नाट्यकर्मीचे दर्शन होत होते. नानांच्या मुखातून ‘वस्त्रहरण’ नाट्यप्रयोगावेळचे किस्से ऐकण्यासाठी संध्याकाळपर्यंत सिंधुदुर्गवासीय आवर्जून उपस्थित होते. त्यांनी सांगितलेल्या अनुभवांच्या शब्दातून खणखणीत विनोद पाझरत होता. त्यांच्यावर मनस्वी प्रेम करणाऱ्या प्रेक्षागृहातील रसिकांच्या अक्षरश: हसून हसून मुरकुंड्या वळत होत्या. ‘वस्त्रहरण’ साठीच्या पहिल्या विदेशवारीदरम्यान विमानप्रवासात आलेले अनुभव सांगताना हास्याचे धुमारे नानांनी फुलवले होते. त्यावेळच्या कविसंमेलनात इतरांच्या कविता ते जाणीवपूर्वक ऐकताना दिसले. नवोदित कवी-कवयित्रींना त्यांच्या कवितांसाठी दाद देताना दिसले. देश-विदेशात पाच हजारांहून अधिक प्रयोग झालेल्या नाटकाच्या लेखकाची साधी राहणी मनावर छाप पाडून गेली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी कुणीही सहजपणाने बोलू शकत होते. आपल्या मोकळ्याढाकळ्या, निरलस संवादशैलीतून त्यांनी बोलणाऱ्याला केव्हाच आपलेसे करून टाकले होते. एवढेच नाही तर, पहिल्यानंच भेटलेल्या सर्वच स्नेहीजनांना स्वतःच्या घरी मच्छीच्या स्वादिष्ट भोजनासाठी, गप्पांसाठी आग्रही आमंत्रण देत होते. जवळून पाहिलेले, अनुभवलेले हे खरोखरच महान लेखक होत. यश तसेच नावलौकिकाचा हात धरून येणारा अहंपणा, इतरांपेक्षा वेगळेपणाची असणारी भावना त्यांच्या मनाच्या तळाशीसुध्दा दिसली नाही. नवोदिताची पाठ थोपटून त्याला पुढे जाण्याचा मंत्र देणाऱ्या या लेखकाने सर्वांच्याच हृदयात जागा घेतली. प्रतिभावंत साहित्यिक, नाट्यकर्मी नानांच्या साध्या,सरळ, मिश्किल, उदार स्वभावाने सर्वांनाच एका उदात्त व्यक्तिमत्वाचा सहवास लाभल्याचे सुख मिळाले.एक सत्य आहे, इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी उदात्त कामगिरी करणारी मनुष्यरत्ने जेव्हा स्वर्गीय प्रवासाला जातात, तेव्हा त्या-त्या क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी आपोआपच निर्माण होत असते. प्रतिभा, पांडित्य, विद्वत्ता आणि अनुभवांच्या पातळीवर कसदार बनलेली व्यक्तिमत्वे पुढच्या प्रत्येक पिढीसाठी दिशादर्शक आधारस्तंभ असतात. अशा थोर माणसांचा सहवास काही क्षणांसाठी जरी लाभला तरी ते आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बनून जातात. श्री. गवाणकर यांच्याबाबतीत हाच प्रत्यय येतो आहे.श्री. गवाणकर यांनी कोकणी मातीशी असलेली नाळ इमानेइतबारे जपली. राजापूर तालुक्यातील माडबन हे श्री. गवाणकर यांचे गाव. त्यांनी लेखन व अभिनय क्षेत्रात स्वच्छंदी प्रवास केला. ‘वस्त्रहरण’ बरोबरच ‘वात्रट मेले’, ‘वरपरीक्षा’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वन रूम किचन’, ‘उषःकाल होता होता’ अशी लिहिलेली नाटकेही प्रचंड लोकप्रिय झाली. ‘जागर’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी संवाद लिहीले. त्यांचे ‘व्हाया वस्त्रहरण’ पुस्तकही फार गाजले. ‘ऐसपैस’ ही कादंबरी व ‘चित्रांगदा’ हा रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखांचा अनुवादित लेखसंग्रहही प्रसिद्ध आहे. ९६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ नाट्यप्रयोगाने कम्मालच केली. आजही या नाटकासाठी प्रेक्षक अधीर असतात. त्यांच्या लेखनातील विनोदी धाटणीने समाजप्रबोधन, मनोरंजन, करमणूक सहजशक्य केली. हे व्यक्तिमत्व कोकणाविषयी अपार प्रेम बाळगून होते. त्यांनी कोकणच्या संस्कृतीची, बोलीभाषेची ओळख पार विदेशापर्यंत नेऊन पोहोचविली. या कर्मयोगी व्यक्तिमत्वास हजारो अभिवादनेही कमीच पडतील. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचा सहवास लाभला, संवाद साधता आला. कृतार्थतेच्या भावनेने हृदय भरून आले!!









