पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, विकसीत भारत हेच आमचे ध्येय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काश्मीरला विशिष्ट दर्जा देणारा भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 370 हा आता कायमचा नाहीसा झाला आहे. त्यामुळे काश्मीरच्या जनतेला तिचे भवितव्य स्वत:च्या हाताने घडविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा अनेक दशके लावून धरला होता. त्याची फलप्राप्ती आता झाली आहे. असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत काढले आहेत.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला त्यांनी ही मुलाखत शनिवारी दिली. देशाचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी ‘जीवायएएन’ (उच्चारी ग्यान) हा मंत्र दिला आहे. जी अर्थात गरीब, वाय अर्थात युवा, ए अर्थात अन्नदाता किंवा शेतकरी आणि एन अर्थात नारीशक्ती या चार समाजघटकांच्या हातीच विकसीत भारताची सूत्रे आहेत. त्यांच्यावरच देशाची भिस्त आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
2047 पर्यंत विकसीत देश
भारत त्याच्या स्वातंत्र्यापासून 100 वर्षांमध्ये, अर्थात 2047 पर्यंत एक विकसीत देश होणार आहे. केंद्र सरकार या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. आमच्या योजना क्षणिक किंवा अल्पकालीन लाभासाठी नसून त्या दीर्घकालीन उद्दिष्ट्यो दृष्टीसमोर ठेवून सज्ज करण्यात आल्या आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले.
कठोर निर्णय घेण्याचे साहस
आमचे सरकार केवळ राजकीय लाभासाठी निर्णय घेत नाही. देशाचे हित होणे आवश्यक आहे, ही आमची भूमिका आहे. त्यासाठी राजकीय धोका पत्करण्यासाठीही आमची सज्जता आहे. केवळ निवडणूक जिंकणे हे आमचे उद्दिष्ट्या कधीच नव्हते आणि नाही, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी मुलाखतीत केली.
लोकांना हवे स्थिर सरकार
वेगवेगळ्या युत्यांनी बनविलेली संमिश्र सरकारे देशात असावीत, ही लोकांची इच्छा नाही. त्यांना भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार हवे आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे ही इच्छा दर्शविली आहे. यंदाच्या निवडणुकीही लोकांचा हाच कल दिसून आला आहे. युतीच्या सरकारांमुळे देशाची 30 सोन्यासारखी वर्षे वाया गेली आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पूर्व आणि दक्षिणेतही पक्षाची वाढ
भारतीय जनता पक्ष हा केवळ उत्तर आणि पश्चिम भारतातील पक्ष नाही. त्याला दक्षिण आणि पूर्व भारतातही स्थान आहे. या दोन्ही प्रदेशांमध्ये आमचा प्रभाव आणखी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे तेथील कार्यकर्ते जीव तोडून परिश्रम करीत आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.
लोकांचा उत्साह अवर्णनीय
आज लोकांमध्ये मोठ्या उत्साहाचा संचार झालेला दिसत आहे. स्वातंत्र्य मिळविण्याच्या काळात लोकांमध्ये जसा उत्साह होता, तसा आज दिसत आहे. त्यामुळेच निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. देशाला विकसीत बनविण्यासाठी आज लोक स्वातंत्र्यलढ्याइतकेच उत्सुक झालेले दिसून येतात, ही वस्तुस्थिती समाधान देणारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आमची गॅरेंटी हा गरीबांचा भरवसा
पंतप्रधान मोदी यांची हमी हा आमचा भरवसा आहे, अशी आज सर्वसामान्यांची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे कर्तव्य करण्यात कधीही मागे हटत नाहीत, ही जनतेची भावना आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी ज्या योजना लागू केल्या आहेत, त्यामुळे हा विश्वास निर्माण झाला आहे. हाच विश्वास आम्हाला लोकसभेच्या आगामी निवडणुकीत प्रोत्साहक ठरणार आहे. आमचा भरवसा लोकांवरच आहे, असेही त्यांनी या प्रदीर्घ मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
जनहितासाठी काहीही करण्यास सज्ज
ड निर्णय घेताना देशहिताला प्राधान्य, म्हणून कठोर निर्णय घेणे शक्य
ड गरीबांसाठीच्या अनेक योजनांमुळे त्यांच्या जीवनात होतेय परिवर्तन
ड गरीब, युवा, शेतकरी आणि महिला यांच्या हितासाठीच सर्व प्रयत्न
ड 2047 पर्यंत विकसीत देश घडविण्यासाठी जनता अतिशय उत्सुक









