विजय सरदेसाई यांची जोरदार टीका : कला-संस्कृती मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी
प्रतिनिधी / पणजी
कला संस्कृतीचे मंदिर समजली जाणारी कला अकादमी इमारत दुरुस्तीच्या नावाखाली अस्तित्वहिन बनविणाऱया कला संस्कृती मंत्र्यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावे. अन्यथा राज्याची तिजोरी लुटण्याच्या या महाघोटाळ्यात मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळच सहभागी असल्याचे समजले जाईल, असा इशारा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.
कला अकादमीची जी वास्तू केवळ 4 कोटी रुपयांमध्ये बांधण्यात आली होती तिच्याच दुरुस्तीसाठी तब्बल 50 कोटी खर्च करण्यात येतात. त्यात आता आणखी 16 कोटींच्या कामाची भर पडली आहे. त्याशिवाय प्रमुख स्टेजच्या खाली बोअरवेल मारण्यात आली आहे, त्यावर अतिरिक्त खर्च झालेला आहे. भविष्यात आणखीही कित्येक कोटी खर्च वाढणार आहे. यावरून ही दुरुस्ती म्हणजे भ्रष्टाचाराचा अखंड वाहणारा झरा बनला आहे. संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत अपयशी ठरले आहेत, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
शहाजानने कापले हात…
गुरुवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री गोविंद गावडे यांच्या दाव्यानुसार ताजमहलच्या बांधकामासाठी शहाजानने निविदा प्रक्रिया केली नव्हती हे खरे असले तरी त्याच शहाजहानने ताजमहल पूर्ण झाल्यानंतर कामगारांचे हात कापले होते, असे सांगण्यात येते. त्याच धर्तीवर आता मंत्री गोविंद गावडे गोव्यातील लोकांचे खिसे कापत आहेत, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
अकादमी म्हणजे वाघा बॉर्डर
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे एरव्ही पारदर्शकतेच्या गोष्टी बोलणाऱया सरकारने कला अकादमीची दुरुस्ती मात्र सर्वांपासून लपवून ठेवली आहे. अकादमीचा परिसर म्हणजे वाघा बॉर्डर असल्याप्रमाणे सील करण्यात आला आहे. तेथे आत काय चालले आहे ते कुणालाही पाहू देण्यात येत नाही, अशी माहिती देऊन, हे काय चालले आहे? असा सवाल सरदेसाई यांनी केला.
बांधकामाबाबत एवढी गुप्तता का?
अकादमीचे दुरुस्तीकाम संबंधित कंपनीला देण्यात मंत्री गावडे यांनी साबांखाला गोवण्याचे प्रयत्न केल्यानंतर नुकतीच मंत्री निलेश काब्राल यांनी तेथील कामाची पाहणी केली. मात्र त्यांची ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली. एरव्ही काब्राल यांना पावलोपावली पत्रकारांची गरज भासते. परंतु कला अकादमीची पाहणी करताना मात्र त्यांनी पत्रकारांना सुद्धा सुगावा लागू दिला नाही, एवढी गुप्तता कशासाठी? असा सवालही सरदेसाई यांनी केला.
ज्या टॅक्सटॉन बिल्डर्स कंपनीला कला अकादमीचे दुरुस्तीकाम देण्यात आले त्यांची कामे दर्जेदार असतात, असे स्वप्रशस्तीपत्र मंत्री गावडे यांनी दिले होते. त्यासाठी त्यांनी त्या कंपनीने मुंबईत जुहू येथील गोवा भवनच्या केलेल्या दुरुस्तीकामाचा दाखला दिला होता. प्रत्यक्षात ते काम केवळ 1.51 कोटी किंमतीचे होते. अशा कंपनीला 50 कोटी खर्चाचे कला अकादमी दुरुस्तीकाम देण्यात आले. त्यानंतर द्राविडीप्राणायम सारखा प्रकार करत त्याच कंपनीला डिसेंबरमध्ये गोवा भवनचे मोठय़ा रकमेचे कंत्राट देण्यात आले
यापूर्वी दि. 16 जानेवारी 2020 रोजी जीएसआयडीसीने कला अकादमीला लिहिलेल्या पत्रात ते 10 कोटी पेक्षा कमी खर्चाची कामे करत नसल्याचे कळविले होते. यावरून कला अकादमीची दुरुस्ती 10 कोटी पेक्षा कमी खर्चात करण्यात येणार होती हेच सिद्ध होत आहे. आता तेच काम तब्बल 49.57 कोटी रुपयांना देण्यात आले आहे, व हा खर्च वाढत जाऊन सध्या 66 कोटींवर पोहोचला आहे, असे सरदेसाई पुढे म्हणाले.









