नव्याने तिघांचा मृत्यू झाल्यानंतर इंफाळमध्ये तणाव : जमावाने अडवले रस्ते
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि मैतेई समुदायामध्ये गेल्या तीन दिवसांपासून चकमक सुरू आहे. शनिवारी नव्याने झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला. तेरखेंगसांगबी कांगवे आणि थोरबुंग येथे या हिंसक चकमकी झाल्या. हा भाग कुकी-मैतेई समुदायांच्या वस्तीमधील भाग असून त्याला बफर झोन असे संबोधले जाते. या भागात झालेल्या तणावाचे पडसाद शनिवारी दिवसभर उमटत होते. संतप्त झालेल्या लोकांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर आंदोलन केल्यामुळे इंफाळपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्यात नव्याने झालेल्या हिंसाचारात युम्नाम जितेन मैतेई (46), युम्नाम पिशाक मैतेई (67) आणि युम्नाम प्रेमकुमार मैतेई (39, सर्व रा. क्वाक्ता लमल्हाई) या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. हल्लेखोर बफर झोन ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या संघर्षात या तिघांचा बळी गेला आहे. जमावाला रोखण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी केल्यावर त्यांच्यात चकमक झाली. यादरम्यान गोळीबार झाल्याने सुरक्षा दलांना प्रत्युत्तर द्यावे लागले. तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सकाळपासून थोरबांग परिसरात डोंगरावरून गोळीबार सुरू होता. तसेच मोर्टार हल्लेही झाले. याचदरम्यान जमावाने अनेक रस्ते अडवले आहेत.
मणिपूरमध्ये 3 मेपासून हिंसाचार सुरूच आहे. वाढत्या हिंसाचाराची दखल घेत मणिपूरच्या डोंगरी आणि घाटी दोन्ही जिह्यांमध्ये एकूण 129 चौक्मया स्थापन करण्यात आल्या आहेत. हिंसाचाराच्या वेगवेगळ्या प्रकरणात 1,047 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचाराला 91 दिवस उलटून गेले असले तरी अजूनही परिस्थिती सामान्य झालेली नाही. या हिंसाचारात आतापर्यंत 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.









