आयसीसीकडून घोषणा : ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड, झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला टाकले मागे
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने 2024 मधील सर्वोत्कृष्ट टी 20 क्रिकेटपटूची घोषणा केली आहे. आयसीसीच्या या पुरस्कारासाठी झिम्बाब्वेचा सिंकदर रझा, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि पाकिस्तानच्या बाबर आझमला नामांकन देण्यात आले होते. पण भारताच्या या गोलंदाजाने सर्वांना मागे टाकत आयसीसी 2024 चा सर्वोत्कृष्ट टी 20 खेळाडूचा किताब जिंकला आहे. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार भारतीय क्रिकेटपटूला मिळाला आहे. 2022 व 2023 मध्ये सर्वोत्तम टी 20 क्रिकेटपटूचा पुरस्कार सुर्यकुमार यादवने मिळवला होता.
2024 मध्ये भारताचा टी 20 मध्ये आघाडीचा विकेट घेणारा अर्शदीप सिंग याला आयसीसी पुरस्कारांमध्ये आयसीसी पुरुष टी 20 क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे. अर्शदीपने 2024 च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. गेल्या काही वर्षांत युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा टी 20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज ठरला आहे. 2024 मध्येही तो भारताचा टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. गतवर्षी टीम इंडियासाठी त्याने 18 टी 20 सामने खेळले आणि एकूण 36 विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीसाठी त्याला झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा, ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड, पाकिस्तानच्या बाबर आझमसह मानांकन मिळाले होते. पण, या दिग्गजांना मागे टाकत अर्शदीपने हा पुरस्कार पटकावला आहे.
वर्षभरात अर्शदीपचा धुमाकूळ
अर्शदीपचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नोव्हेंबर 2022 मध्ये झाले होते. त्याने अवघ्या 2 वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही केला आहे. त्याने टीम इंडियासाठी टी 20 मध्ये आतापर्यंत 97 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या तुलनेत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला हा टप्पा गाठता आलेला नाही. यापूर्वी हा विक्रम युझवेंद्र चहलच्या नावावर होता. युजवेंद्र चहलने टी 20 मध्ये टीम इंडियासाठी 96 विकेट घेतल्या आहेत. पण अर्शदीपने इंग्लंडविरुद्ध टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला मागे टाकत नवा इतिहास घडवला.









