गैरव्यवहारांमुळे एकंदर 59 जणांवर ‘सेबी’ची कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अर्षद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि त्याचा भाऊ यांच्यावर सेबीने एक वर्षांची शेअरबाजार बंदी घोषित केली आहे. एकंदर 59 जणांवर अशी बंदी घालण्यात आली आहे. साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड या कंपनीच्या गैरव्यवहारांच्या संबंधात ही बंदी घालण्यात आल्याचे सेबीने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
अर्षद वारसी आणि त्याचे कुटुंबीय तसेच त्याचा गट यांनी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड या मिडिया कंपनीच्या समभागांची किंमत कृत्रिमरित्या वाढविण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला, असा आरोप होता. या आरोपात तथ्य आढळल्याने ही बंदी घालण्यात आली. बंदीसमवेत त्यांना दंडही करण्यात आला असून प्रत्येकी 5 लाख रुपयांचा हा दंड आहे.
तसेच गैरव्यवहारातून त्यांना झालेला 1 कोटी 5 लाख रुपयांचा नफाही परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी मिश्रा आणि वारसी यांच्यातील व्हॉट्सअॅप संवादातून हे प्रकरण बाहेर आले होते. वारसी, त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी 25 लाख रुपये जमा करण्याचा प्रस्ताव मिश्रा याने ठेवला होता, असे आढळल्याने प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
अयोग्य प्रचार
साधना ब्रॉडकास्टींग कंपनीमध्ये गुंतवणूक केली जावी, म्हणून या कंपनीचा अतिरंजित आणि नियमबाह्या प्रचार करण्यात आला. त्यामुळे या कंपनीच्या सभमागांचा दर प्रमाणाबाहेर वाढला. गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. त्यामुळे वारसी याचे कुटुंब आणि अन्य प्रवर्तकांना अवैध लाभ झाला, असे सेबीच्या तपासणीत आढळून आले आहे. आम्ही शेअरबाजारामध्ये नवे होतो. त्यामुळे आम्हाला नियम काटेकोरपणे माहीत नव्हते, असा बचाव करण्याचा प्रयत्न वारसी आणि त्याच्या कुटुंबियांनी केला. तथापि, तो प्रयत्न वाया गेला.
किती जणांना शिक्षा
शेअरबाजारात गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेबीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकंदर 59 जणांवर कारवाई केली आहेत. त्यांच्यापैकी 5 जणांवर प्रत्येकी 5 वर्षांची शेअरबाजार बंदी घालण्यात आली आहे. तर उरलेल्या 54 जणांवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या 54 जणांमध्ये वारसी कुटुंबियांचा समावेश आहे.









