बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
बेळगाव : खंडेनवमी व विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होऊ लागली आहे. मंगळवारी आठवडी बाजार बंद असतानाही ऊस, झेंडूची फुले, तसेच पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी ऊस विक्री करण्यात येत असल्याचे चित्र दिसून आले. मुख्य बाजारपेठेसह काकतीवेस रोड, यंदे खूट, कलमठ रोड, वडगाव रोड, शहापूर, हिंडलगा गणपती मंदिर, शाहूनगर रोड या परिसरात उसाची विक्री सुरू आहे. 80 ते 100 रुपयांना पाच ऊस विक्री केले जात आहेत. त्याचबरोबर झेंडू, तसेच शेवंती फुलांची विक्रीही वाढली आहे. खंडेनवमीदिवशी करण्यात येणाऱ्या पूजेवेळी झेंडूच्या फुलांना महत्त्व असते. त्यामुळे ठिकठिकाणी फुलांची विक्री करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्यातील काही भागातून ऊस शहरात विक्री केले जात आहेत. खंडेनवमीला ऊस लावून अवजारे, तसेच शस्त्रांची पूजा केली जाते. त्यामुळे घरोघरी उसाची मागणी आहे. झेंडूच्या सुट्या फुलांसह माळादेखील विक्री केल्या जात आहेत. त्याचबरोबर इतर फुलेही चढ्यादराने विक्री केली जात आहेत. हार, फुले, केळीची पाने, नारळ, अगरबत्या यांचीही विक्री केली जात आहे. यावर्षी नारळाचा दर कमालीचा वाढला आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे विक्रेत्यांचा काहीसा हिरमोड झाला. परंतु सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने खरेदीचा उत्साह दिसून आला.









