विमानतळावर गोमंतकीय पद्धतीने उत्साहात स्वागत : पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत 156 क्रीडापटू होणार दाखल
वास्को : गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मंगळवारी दुपारी उत्तराखंड राज्यातून पहिल्या संघाचे गोव्यात आगमन झाले. उत्तराखंडचा हा बॅडमिंटन संघ आहे. या संघाचे दाबोळी विमानतळावर राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी पारंपरिक वाद्य संगीताच्या तालावर उत्साहात स्वागत केले. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर व क्रीडा खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मंगळवारी दुपारी उत्तराखंड राज्यातील या बॅडमिंटन संघाचे दाबोळी विमानतळावर आगमन होताच त्यांचे स्वागत करताना क्रीडामंत्री गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व देशातील क्रीडापटूंचे गोव्यात आगमन हा गोव्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांनिमित्त गोव्यात येणाऱ्या विविध क्रीडा संघ व क्रीडापटू हे गोव्याचे पाहुणे असून ‘अतिथी देवो भव’ या तत्त्वानुसार त्यांचे स्वागत आम्ही करीत आहोत. गोव्याचे ते कर्तव्य आहे. क्रीडापटूंची आवश्यक ती सर्व सोय करण्यात आलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आज गोव्यात पहिल्या क्रीडासंघाचे आगमन झाले आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत गोव्यातील विविध रेल्वेस्थानके, मोपा व दाबोळी विमानतळ तसेच काही क्रीडापटू खासगी वाहनांनीही गोव्यात येणार आहेत. आज पहिल्या दिवशी एकूण 156 क्रीडापटू गोव्यात दाखल होतील, अशी माहिती त्यांनी दिली. दाखल झालेल्या खेळाडूंसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
आमदार दाजी साळकर यांनीही यावेळी बोलताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही गोव्यासाठी एक संधी असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी व क्रीडामंत्र्यांनी या स्पर्धांच्या आयोजनासाठी बरेच कष्ट घेतलेले आहेत. चांगल्या सोयीसुविधा गोव्यात उपलब्ध केलेल्या आहेत. गोवेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करून आमदार साळकर यांनी या स्पर्धांच्या आयोजनासाठी गोव्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दरम्यान, दि. 25 पासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांच्या क्रीडा ज्योतीचे मंगळवारी सकाळी वास्कोत आगमन झाले. या क्रीडा ज्योतीचे वाहतूक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी मुरगाव पालिका इमारतीसमोर स्वागत केले. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीष बोरकर, उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, चिखली उपसरपंच ऐश्वर्या कोरगांवकर, नगरसेविका शमी साळकर, श्रद्धा महाले, देविका आरोलकर, मामलेदार प्रविणजय पंडित, म्युनिसीपल हायस्कूलचे विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते. ही ज्योत वास्को शहरासह पूर्ण मुरगाव तालुक्यात फिरवण्यात आली.









