खासदार सदानंद तानावडे यांच्याहस्ते स्वागत
लाटंबार्से : देशातील प्रत्येक नागरिकाला सुखी करून भारत जगातील एक विकसित देश करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृढ संकल्प केला आहे. 2047 पर्यंत हा संकल्प पूर्ण करणे, हे त्यांचे ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले. भाजपच्या ‘विकसित भारत-संकल्प यात्रे’च्या आगमनानिमित्त मुळगाव येथे आयोजित सोहळ्यात खासदार तानावडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाजपचे सरकार अंत्योदय तत्त्वावर कार्यरत असून, पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे तानावडे यांनी सांगून, विकसित देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. गावकरवाडा-मुळगाव येथील श्री केळबाई देवस्थान सभागृहात आयोजित या सोहळ्याला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, ‘आईईसी’चे प्रमुख संजय मुदगल, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, सरपंच तृप्ती गाड, देवस्थानचे अध्यक्ष वसंत गाड आदी उपस्थित होते. आमदार डॉ. शेट्यो यांनी ‘विकसित भारत-संकल्प यात्रे’चा उद्देश स्पष्ट करून, सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले. प्रदीप रेवोडकर यांचेही भाषण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेंतर्गत देशभर 2ा़विकसित भारत-संकल्प यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मुळगाव येथे पोहोचताच प्रमुख पाहुणे खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर झालेल्या सोहळ्यात कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.









