राष्ट्रीय बैठकीसाठी पाच दिवस मुक्काम सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
प्रतिनिधी /फोंडा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे संघ परिवाराच्या समन्वय बैठकीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत. नागेशी फोंडा येथील श्री नागेश महारुद्र देवस्थानच्या सभागृहात होणाऱया बैठकीनिमित्त 6 जानेवारीपर्यंत त्यांचा मुक्काम राहणार आहे.
सोमवारी दुपारी दाबोळी विमानतळावरुन त्यांचे नागेशी-फोंडा येथे आगमन झाले. श्री नागेशी येथे पोचल्यानंतर देवस्थानतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. देवदर्शन घेतल्यानंतर सायंकाळी त्यांनी भगवती मंदिर, ढवळी येथे संघाचे प्रमुख कार्यकर्ते महेश ढवळीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत ते ढवळीकर यांच्याकडे थांबले होते. भागवत यांच्या दौऱयादरम्यान नागेशी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागेशी येथे चार दिवस चालणाऱया संघ परिवाराच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर मातृशाखांचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. येत्या 7 जानेवारी रोजी पणजी येथे गोव्यातील स्वयंसेवकांना मोहनजी भागवत मार्गदर्शन करणार आहेत.









