► प्रतिनिधी/ बेळगाव
किरकोळ बाजारात आंब्यांची आवक वाढू लागली आहे. ग्राहकांकडून आंब्याची चव चाखण्यासाठी खरेदी होऊ लागली आहे. 450 रुपये डझन याप्रमाणे विक्री सुरू आहे. हापूस, तोतापुरी व इतर जातीचे आंबे पाहावयास मिळत आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे ऐन हंगामात बाजारपेठा बंद राहिल्याने आंबा खरेदी करता आला नाही. मात्र, यंदा बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्याने ग्राहकांना मनमुरादपणे आंबा खरेदी करता येत आहे.
फळांचा राजा हापूस आंबा दाखल होऊ लागला आहे. त्यामुळे आंबा प्रेमींकडून खरेदी होऊ लागली आहे. मागील दोन वर्षात ऐन हंगामात आंबा खरेदी थांबली होती. मात्र्। यंदा आंबा खरेदीला ऊत आला आहे. असे असले तरी यंदा एकूण आंबा उत्पादनात मात्र घट झाल्याची माहिती बागायत खात्याने दिली. विशेषत: बाजारात कोकणातील रत्नागिरी, देवगड येथून हापूस व धारवाड, हुबळी येथून इतर जातीचे आंबे दाखल होऊ लागले आहेत. शिवाय स्थानिक आंबादेखील हळुहळू बाजारात येऊ लागला आहे. हापूस वगळता इतर आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.
होलसेल फळबाजारात आंब्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे बाजार आंब्यांनी बहरू लागला आहे. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांकडून खरेदी वाढू लागली आहे. विशेषत: गोव्यातूनही मागणी वाढू लागली आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजार, काकतीवेस, रेल्वे स्टेशन, बसस्थानक यासह शहराबाहेरील रस्त्यांवरही आंब्यांची विक्री होऊ लागली आहे.
आंबा लवकर पिकण्यासाठी रासायनिक प्रक्रियेचा वापर वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आंबा सावधगिरीने खरेदी करणे आवश्यक आहे. चांगल्या प्रतीचा आंबा कोणता? हे ओळखून खरेदी करावी, असे आवाहन बागायत खात्याकडून केले जात आहे. आंब्याला चांगला रंग चढण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे असा आंबा शरीराला हानिकारक आहे. त्यामुळे आंबाप्रेमींनी सावध असणे आवश्यक आहे.









