वृत्तसंस्था / जगन्नाथ पुरी
ओडीशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भगवान जगन्नाथांचा रथ ऐतिहासिक गुंडीचा मंदिरात पोहचला आहे. भगवान जगन्नाथ यांच्यासह भलभद्र आणि माता सुभद्रा यांचेही आगमन या मंदिरात झाले आहे. जगन्नाथांच्या या महोत्सवात या मंदिरातील हे आगमन अतिशय महत्वाचे मानले जाते.
गुंडीचा मंदीर हे भगवान जगन्नाथांच्या काकीचे, अर्थात महाराणी गुंडीचा यांचे मंदीर आहे, असे मानले जाते. या महोत्सवाची परंपरा म्हणून प्रत्येक वर्षी भगवान जगन्नाथ आणि त्यांच्यासह बलभद्र आणि माता सुभद्रा या मंदिरात आगमन करुन महाराणी गुंडीचा यांची भेट घेतात. त्यामुळे हा दिवस महत्वाचा मानला जातो. या तीन देवतांचे दर्शन त्यांचे आगमन गुंडीचा मंदिरात झाल्यानंतर घेतले तर ते अत्यंत पुण्यप्रद आहे, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे जगन्नाथ यात्रोत्सवाच्या या दुसऱ्या दिवशी गुंडीचा मंदिरात भाविक प्रचंड संख्येने उपस्थित असतात. या मंदिरात या तीन देवतांचे दर्शन महाराणी गुंडीचा यांच्यासह घेतल्यास माणूस जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो आणि त्याला मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.









