घरोघरी गौराईचे आगमन, पंचगंगा नदी, राजाराम बंधारा, कळंबा तलावावर पारंपरिक गाण्यांचा फेर, झिम्माफुगडी, पिंगा, कटवटकणा खेळ रंगला, आज शंकरोबाचे आगमन
‘ये ग गौराबाई…,‘ चला ग मंगळा गौरीचा करूया जागर, ’घागर घुमु दे घुमु दे रामा पावा वाजू दे… यासह विविध पारंपरिक गीते सादर करीत महिलांनी फेर धरला. गौरी आगमनानिमित्त पंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, राजाराम बंधारा व कोटीतिर्थ आदी ठिकाणी महिलांचा मेळाच भरला होता. पारंपारिक वेशभूषा करीत नटून-थटून सुवासिनींसह तरुणीं आणि मुलींनी गौराईचे उत्साहात स्वागत केले. गौराईच्या डहाळ्यांना नदी पात्रात स्नान घालून हळदी-कुंकू वाहून पुजन केले. मनसोक्त झिम्मा फुगडय़ाही घालत आनंद व्दिगुणीत केला. त्यानंतर पारपरिक वाद्याच्या
साथीने गौराईच्या ढहाळ्यांना घरी आणले.
लाडक्या बाप्पांपाठोपाठ गौराईचे शनिवारी आगमन झाले. सुवासिनी, तरुणी व लहान मुलींनी गौराईच्या ढहाळयांना पंचगंगा नदीत स्नान घालून पूजन केले. गौराई आगमनाची पारंपरिक गीते सादर करून गौराईच्या ढहाळ्यांभोवतीने फेर धरला. अशातच अनेक जणी देहभान विसरुन झिम्मा-फुगडी, पिंगा, काटवटकणा आदी खेळात रमल्या होत्या. मनसोक्त खेळ खेळल्यानंतर गौराईच्या ढहाळ्यांना कलशामध्ये विराजमान केले. या कलाशासमोरच मानाचा विडय़ा ठेवून आरतीसुद्धा केली. त्यानंतर कलशांना डोक्यावर घेऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूकीने आपापल्या घरी आणून पाच पावलांनी स्वागत केले. गौराईच्या आगमनानंतर भाजी-भाकरीचा नौवद्य दाखवून दर्शन घेतले. सायंकाळी भरजरी काटापदराच्या साडय़ा नेसवून आणि दागिन्यांनी गौराईला सजवत प्रतिष्ठापना केली. रात्री उशिरा प्रत्येक गल्लीत महिलांनी गौराईच्या गाणी सादर करीत फेर धरला होता. झिम्मा-फुगडी, पिंगा, काटवटकणा आदी खेळ सादर करीत मनसोक्त जल्लोषही केला.
पंचगंगा नदीघाटावर महिलांचा उत्साह
पंचगंगा नदीघाटावर गौराई आगमनासाठी पेठा-पेठातील महिलांनी नटून-थटून पंचगंगा नदीघाटावर हजेरी लावली होती. महिलांनी कासोटा, चोळीखण साडी, शेला, कोल्हापुरी साज, ठुशी, नथ, भोरमाळ, बाजूबंध, आदी दागिने परिधान केले होते. गौराई आगमनामुळे महिलांच्या चेहऱयावर आनंद दिसत होता.









