वृत्तसंस्था/ कराची
तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे पाकिस्तानमध्ये गुरुवारी आगमन झाले. इंग्लंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात सात सामन्यांची टी-20 मालिका 20 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे.
इंग्लंडचा क्रिकेट संघ यापूर्वी म्हणजे 2005 साली पाकमध्ये मालिका खेळण्यासाठी आला होता. त्यानंतर गेल्या वषी इंग्लंड संघाचा पाकचा नियोजित दौरा शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला होता. सुरक्षिततेच्या कारणावरून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनीही पाक दौऱयातून माघार घेतली होती. 2009 साली लाहोरमध्ये लंकन संघाला घेऊन जाणाऱया बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यानंतर पाकमध्ये कोणताही विदेशी संघ खेळण्यास तयार झाला नाही. पाक क्रिकेट मंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली. यानंतर पीसीबीने आपल्या संघाला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी त्रयस्थ ठिकाणांची निवड केली. या निर्णयानंतर 2012 साली पाक आणि इंग्लंड तसेच 2015 साली पुन्हा या दोन संघांमध्ये मालिका संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविल्या गेल्या.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वातावरणाला पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरुवात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलिया संघाने पाकचा यशस्वी दौरा केला. ऑस्ट्रेलिया संघाने जवळपास 25 वर्षांनंतर पाकचा हा दौरा केला होता. या दौऱयावेळी पाकला पुराचा जबरदस्त तडाखा बसला होता. त्यामुळे पाकमधील लाखो लोकांना या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागले होते.
पाक आणि इंग्लंड यांच्यातील सात सामन्यांची टी-20 मालिका 20 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपूर्वी ही मालिका दोन्ही संघांना सरावाची संधी उपलब्ध करून देणारी आहे. पाक दौऱयासाठी जोस बटलरच्या नेतृत्वाखाली 19 जणांचा संघ गुरुवारी पाकमध्ये दाखल झाला. या मालिकेतील सामने कराची आणि लाहोर येथे 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान खेळविले जातील. ही मालिका झाल्यानंतर इंग्लंडचा संघ येत्या डिसेंबरमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी पुन्हा पाकमध्ये दाखल होणार आहे. या आगामी टी-20 मालिकेवेळी प्रख्यात क्रिकेट समालोचक डेव्हिड गॉवर, मार्क बुचर, पाकचे वासीम अक्रम, वकार युनुस, आमिर सुहेल, बजीद खान आणि युरोज मुमताज हे क्रिकेटचे समालोचन करणार आहेत.









