विविध ढोलताशा, लेझीम, ध्वजपथकांचा सहभाग : जयघोषात-पारंपरिक वाद्यांच्या गजरात अनगोळच्या राजाचे दिमाखात आगमन

प्रतिनिधी /बेळगाव
बाल गणेशोत्सव मंडळ, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, अनगोळ या मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे रविवारी ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अनगोळच्या राजाचे दिमाखात आगमन झाले.
अनगोळ नाका येथून श्रीमूर्ती आगमन सोहळय़ाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी मंडळाचे ज्ये÷ कार्यकर्ते संजय पाटील व इतर पदाधिकाऱयांच्या हस्ते आरती व पूजन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात परिसरातील वातावरण मंगलमय बनले होते.
या मिरवणुकीत नरवीर ढोल ताशा पथकाचे वादन व रणरागिणी ध्वजपथक आकर्षण ठरले होते. पारंपरिक धनगरी ढोलपथक, कोरे गल्ली येथील लहान मुलांच्या लेझीम पथकानेही या मिरवणुकीत भाग घेतला होता. अनगोळ मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक धर्मवीर संभाजी चौक येथे पोहोचली. श्रीमूर्ती पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांची गर्दी झाली होती. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.









