बेळगाव : अनगोळ येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीराम युवक मंडळ, राजहंस गल्ली, भांदूर गल्ली, मराठा चौक व विद्यानगर येथील गणरायांचा आगमन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. अनगोळ नाका येथे सर्व श्री मूर्तींचे एकत्र पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त भूषण बोरसे, समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, राहुल जारकीहोळी, कपिल भोसले, उमेश कुऱ्याळकर, महांतेश असलकर, केदारी जाधव, उमेश भांदुर्गे, सर्व मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. अनगोळ मुख्य रस्त्यावरून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत घोडेस्वार सहभागी झाले होते.
हत्तीवर छत्रपती शिवरायांची मूर्ती विराजमान झाली होती. मिरवणुकीत कुरबर ढोल पथक, अनगोळ येथील बाप्पा ढोलताशा पथक, सुळेभावी येथील वीर गर्जना ढोलताशा पथक, महाराष्ट्र लाकूबाबा हलगी पथक, परांडा शिराळ येथील हलगी पथक सहभागी झाले होते. राजहंस गल्ली, भांदुर गल्ली, विद्यानगर व मराठा चौक येथील गणेश मंडळांनी यंदा डॉल्बीमुक्त मिरवणूक काढून पारंपरिक वाद्यांना पसंती दिल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ येथील श्री मूर्तीचा आगमन सोहळा बाबले गल्ली येथून सुरू झाला. सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्या हस्ते श्री मूर्तीचे पूजन करण्यात आले. शिवरायांच्या मूर्तीचे पूजन ओंकार देसाई यांनी केले. मिरवणुकीत वज्रनाद ढोलताशा पथक सहभागी झाले होते.









