कराड / प्रतिनिधी :
पोलीस उपअधीक्षकपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अमोल ठाकूर ऍक्शन मोडवर आले असून त्यांनी कराड शहर व परिसरात कारवाईचा धडाका लावला आहे. शनिवारी कराडच्या बसस्थानक परिसरात पिस्टलसह जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या संशयिताला सापळा रचून पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने ताब्यात घेतले.
शंकर बदू जाधव (रा. वाघेश्वर, मसूर, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. पिस्टल विक्री करण्यापूर्वी पोलिसांनी त्याला गजाआड केले असून ज्याला विक्री करायला आला होता, त्यालाही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
कराड शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी विविध कारवायांची मोहीम सुरू केली आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. शनिवारी त्यांना कराड बसस्थानकाजवळ शंकर बदू जाधव हा संशयित पिस्टल घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. ठाकूर यांनी त्या अनुषंगाने हॉटेल कृष्णा पॅलेसच्या समोरील परिसरात उपनिरीक्षक पुजारी, अरुण दुबळे, सागर बर्गे, आसिफ जमादार, प्रवीण पवार, सचिन साळुंखे, सुधीर जाधव या पोलीस पथकाला साध्या वेशात सापळा रचण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळय़ा वेशात त्या परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले. शंकर जाधव याची हालचाल संशयास्पद वाटताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना कळवण्यात आले. ठाकूर यांनी तत्काळ त्याला पकडण्याच्या सूचना दिल्या. शंकर जाधव याला पेलिसांनी पकडून ठेवत त्याची झडती घेतली. त्याच्याकडे पिस्टल, जिवंत काडतुसे मिळून आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.