बेळगाव : बसुर्ते (ता. बेळगाव) येथील अंगणवाडी साहाय्यिकेवर विळ्याने हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला गुरुवारी काकती पोलिसांनी अटक केली आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. अंगणवाडीतील बालकांनी फुले तोडल्याचे निमित्त होऊन ही घटना घडली होती. कल्लाप्पा ऊर्फ कल्याणी जोतिबा मोरे रा. दत्त गल्ली, बसुर्ते असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी कल्याणीला अटक केली असून
रात्री त्याला न्या यालयासमोरहजर करण्याची प्रक्रिया सुरू
होती. दि. 1 जानेवारी रोजी बसुर्ते येथील अंगणवाडी साहाय्यिका सुगंधा गजानन मोरे (वय 51) हिच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सुगंधा यांचे नाक कापले गेले. गुरुवारी बसुर्ते येथील डोंगराळ भागात लपून बसलेल्या कल्याणीला शोधून अटक करण्यात आली. अंगणवाडी साहाय्यिकेवर हल्ला करणाऱ्या संशयिताला अटक करावी, या मागणीसाठी अंगणवाडी नोकर संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अंगणवाडीतील बालकांना शौचालयाला घेऊन जाताना शेजारच्या घराजवळील फुले तोडल्याचे निमित्त होऊन हा हल्ला झाला होता.









