वृत्तसंस्था / कॅलिफोर्निया
एका नवजात अर्भकाच्या 30 वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणी पोलिसांनी या अर्भकाच्या मातेला अटक केली आहे. ही घटना अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतात घडली आहे. या प्रकरणी पमेला फेरेरा या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्s वय 60 वर्षांचे आहे. 3 डिसेंबर 1994 या दिवशी या नवजात अर्भकाचे मृत शरीर पोलिसांना गॅरिन रोड या महामार्गावर आढळले होते. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या अर्भकाच्या मातेनेच त्याची हत्या केली असल्याचा पुरावा आता सापडल्याने मातेला अटक करण्यात आली.
या अर्भकाची हत्या करण्यात आली तेव्हा त्याचे वय 3 दिवसांचे होते. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. तथापि, त्यांना गुन्हेगाराला पकडण्यात अपयश आले होते. त्यामुळे तपास थांबविण्यात आला आणि या प्रकरणाची फाईल बंद करुन टाकण्यात आली होती. तथापि, अलिकडच्या काळात जनुकीय तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसीत झाल्याने आणि त्या अर्भकाचा डीएनडी नमुना त्यावेळी घेण्यात आला असल्याने इतक्या वर्षांनंतर त्याच्या हत्येचे गूढ उकलले.
अर्भकाचे नाव ‘बेबी गॅरीन’
त्यावेळी अज्ञात आलेल्या या अर्भकाचा मृतदेह गॅरीन नामक महामार्गावर सापडल्याने तपास अधिकाऱ्यांनी त्याचे नाव बेबी गॅरीन असे ठेवले होते. ते मृतावस्थेत जन्माला आलेले अर्भक आहे, अशी त्यावेळी समजूत झालेली होती. तथापि, पोलिसांना या अर्भकाची हत्या झालेली आहे, असा संशय होता. त्यामुळे या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली असूनही कॅलिफोर्निया पोलिस या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. अखेर पमेला फेरेरा या महिलेला डीएनए तपासणीच्या आधारावर अटक करण्यात आली. या महिलेने अटकेला कोणताही विरोध केला नाही. सध्या तिला पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलिस पुढचा तपास करीत आहेत. मात्र, ही 30 वर्षांनंतर केलेली अटक चर्चेचा विषय बनली आहे. या महिलेने आपल्या 3 दिवसांच्या अर्भकाची हत्या का केली, हे गूढ अद्यापही आहे.









