कुडाळ पोलिसांवर राजकीय दबाव ; धनगर बांधवांचा आरोप
कुडाळ –
बेळगाव येथे मित्राच्या घरी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या चंद्रकांत सखाराम मराठे ( घावनळे – बामणादेवी ) याला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी सोमवारी कुडाळ पोलीस ठाण्यात धडक दिली.संशयिताच्या प्रविण नामक साथीरादाकडून पोलीस का माहिती घेत नाहीत? कुडाळ पोलीस संशयिताला पाठीशी घालत आहेत का ? असा सवाल या समाज बांधवांनी केला.पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोपही करण्यात आला. त्यावर आरोपीच्या बाजूने पोलीस नाहीत. ते आरोपीला अटक करुन शिक्षा कशी होईल. या दृष्टीने तपास काम करीत आहेत. संशयिताला जामीन मिळणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.दोन दिवसात त्याला अटक केली जाईल, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी धनगर समाज बांधवांना दिली.दारू सोडविण्यासाठी आंबोली येथे औषध आणण्यासाठी जाऊया, असे सांगून आपल्या कारमधून बेळगाव येथे मित्राच्या घरी नेऊन शारीरिक संबंध ठेवल्याची फिर्याद कुडाळ तालुक्यातील एका 42 वर्षीय पीडित महिलेने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर सदर फिर्याद झिरो क्रमांकाने कुडाळ पोलीस ठाण्यात वर्ग दाखल करून संशयित चंद्रकांत मराठे याच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु चंद्रकांतला अजून पोलिसांनी अटक केली नाही. चंद्रकांत याला अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याने धनगर समाज संघटनेच्यावतीने धनगर समाज बांधवांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धडक देत निरिक्षक श्री मगदूम यांच्याशी चर्चा केली. घावनळेचे माजी उपसरपंच दिनेश वारंग व अॅड. किशोर वरक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक श्री मगदूम याना निवेदन देण्यात आले. सरपंच आरती वारंग, उपसरपंच योगेश घाडीगावकर, प्रभाकर वारंग , भाजप व्हिजेएनटी जिल्हा सरचिटणीस दिपक खरात, सुरेश झोरे, आबा कोकरे, रामचंद्र कोकरे, संतोष कोकरे, मयुरी कोकरे, सावित्री कोकरे, तारामती कोकरे आदिसह धनगर बांधव उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षांपासून धनगर या भटक्या जमातीतील लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. मात्र या समाजातील बहुतांशी लोक अशिक्षित असल्यामुळे व त्यांना कायद्याचे ज्ञान नसल्याने त्यांच्याकडून पोलीस स्थानकात अत्याचार करणार्या लोकांविरुद्ध गुन्हे नोंद करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.तसेच पोलीस प्रशासनाकडूनही या समाजातील लोकांना न्याय मिळत नसल्याने त्यांना अत्याचारास सामोरे जावे लागत आहे,अशी खंत निवेदनाद्वारे व्यक्त करुन आरोपीला लवकर अटक करण्यात यावी , असे निवेदनात म्हटले आहे. कुडाळ पोलिस ठाण्याचा एक पोलीसच या आरोपीच्या संपर्कात आहे, असा आरोप ग्रामस्थ व धनगर समाज बांधवांनी यावेळी केला.









