पुणे / प्रतिनिधी :
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट असून, अद्यापही त्यांच्यावर कारवाई होत नाही. मारेकऱ्यांची विचारधारा, संघटना आणि त्यांचे पाठीराखे कोण आहेत, याची जाणीव सर्व जगाला झाली आहे. त्यामुळे या मारेकऱ्यांना व त्यांच्या सूत्रधारांना अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी पुण्यातील विवेक निर्धार मेळाव्यात बोलताना केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एस. एम. जोशी सभागृह येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, रझिया पटेल, महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बागवे यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पाटील म्हणाले, इतिहासात राजा किंवा नेता मारला गेला की राज्य, पक्ष किंवा संघटना संपून जाते. परंतु, महा. अंनिसच्या बाबतीत तसे घडले नाही. डॉ. दाभोलकरांच्या खूनाला दहा वर्षे होऊनही संघटनेचे काम थांबलेले नाही. संघटना ताकदीने उभी राहिल्याचे यासारखे देशात मागील 50 वर्षाच्या काळात दुसरे उदाहरण नाही.
डॉ. पुनियानी म्हणाले, की कुठलाही धर्म धोक्यात नसतो, धोक्यात असते ती काही लोकांची सत्ता. ज्याला ते धर्माच्या आधारे मिळवितात. स्वातंत्र्यलढय़ात फुले, गांधी, नेहरू, आंबेडकर यांनी वैज्ञानिक दृष्टी असलेली समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आपणाला दिली. त्याच्याविरोधात दुसऱ्या बाजूला धर्म, द्वेष आणि विषमतेवर आधरित मूल्यांचा प्रसार करण्यात आला. डॉ. दाभोलकरांचा खून देखील, अशी मूल्ये जपणाऱ्या विचारसरणीतून करण्यात आला आहे.
हेमंत देसाई म्हणाले, देशात धर्म आणि राजकारण यांची युती झाली आहे. यातून धर्मवादास पाठबळ दिले जात आहे. सरकार केवळ सण साजरे करण्यासाठी स्थापन झाले आहे का? सत्य आणि अहिंसा ही कचऱ्यात टाकलेली मूल्ये बनली आहेत. ती रुजविण्यासाठी 100 दाभोलकरांची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बनसोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन विशाल विमल यांनी केले.