वकिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, अन्यथा धरणे आंदोलन
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील चन्नापूर तांडा येथे विनोद पाटील या वकिलासह त्याच्या कुटुंबीयांवर 20 जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणी रामदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. सदर आरोपींना तातडीने अटक करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येईल, असा इशारा देत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर वकिलांनी मोर्चा काढून अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन दिले.
विनोद पाटील हे पेशाने वकील असून ते जिल्हा आणि तालुका न्यायालयात वकिली करतात. एका जमीन प्रकरणात त्यांनी न्यायालयातून स्थगिती आणली होती. याच कारणातून काही जणांनी त्यांच्यावर राग धरला होता. अॅड. विनोद पाटील हे रविवार दि. 23 मार्च रोजी आपल्या चन्नापूर तांडा, ता. रामदुर्ग येथील गावी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासह कुटुंबीयांवर 20 जणांनी हल्ला केल्याने वकिलासह नऊ जण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी रामदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. आरोपींना अटक झाली नसल्याने त्यांच्याकडून पुन्हा वकिलाच्या कुटुंबीयांना धमकावले जात आहे. त्यामुळे कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे. या मारहाणीच्या घटनेला चार दिवस उलटले असले तरी पोलिसांनी दुर्लक्ष करत आरोपींना अटक केली नाही. तातडीने हल्लेखोरांना अटक न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येईल, असा इशारा यावेळी वकिलांनी दिला. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी अॅड. एन. आर. लातूर यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.









