जामा मशीद समितीचे मुख्य वकील जाफर अली यांना अटक
वृत्तसंस्था/ संभल
उत्तर प्रदेशातील संभलच्या जामा मशीद समितीचे प्रमुख वकील जाफर अली यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. जमावाला भडकवल्यासंबंधीचे सबळ पुरावे सापडल्यानंतर रविवारी पहाटे त्यांना ताब्यात घेण्यात आले. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल पोलीस अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. जाफर अली यांना शनिवारी न्यायिक आयोगाकडून समन्स मिळाला होता. अटकेच्या कारवाईदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जाफर अली यांच्यावर झालेली कारवाई असंवैधानिक असल्याचा दावा त्यांच्या भावाने केला आहे. त्यांना न्यायिक आयोगासमोर निवेदन देण्यापासून रोखण्यासाठी ही असंवैधानिक कारवाई करण्यात आल्याचा आरोप जाफर अली यांचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर यांनी केला आहे. आम्ही आमची लढाई सुरूच ठेवू, असेही ते पुढे म्हणाले.
संभल जामा मशिदीचे प्रमुख वकील जाफर अली आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये यापूर्वी अनेक वेळा वाद झाले आहेत. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. 24 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोपही जामा मशीद समितीच्या प्रमुखांनी केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार 24 नोव्हेंबर रोजी संभल येथील जामा मशिदीत सर्वेक्षण केले जात होते. काही लोक त्याला विरोध करत होते. याचदरम्यान हिंसाचार, गोळीबार आणि दगडफेक झाली. हिंसाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी अनेक लोकांना तुरुंगातही पाठवले आहे.









